अनुभवातूनच माणूस समृध्द
By Admin | Published: December 13, 2015 10:49 PM2015-12-13T22:49:58+5:302015-12-14T00:16:22+5:30
आ. ह. साळुंखे : रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनात प्रतिपादन
रहिमतपूर : कोणताही साहित्यिक सभोवतालच्या परिस्थितीतून घडत असतो. त्यामुळे त्याचे नाते समाजाशी असले पाहिजे. समाजाच्या सुख-दु:खाशी त्यांना समरस होता आले पाहिजे. साहित्यिकांसाठी अनुभव, चिंंतन व अभिव्यक्ती या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. माणूस अनुभवातूनच श्रीमंत व समृध्द होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले.रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे रसिक साहित्य परिवार व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा रहिमतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचक्रोशी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ विवेकवादी विचारवंत डॉ. शरद अभ्यंकर, स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे, स्वागताध्यक्ष मधुकर माने, प्रा. हिंंदुराव पवार, चंद्रहार माने, शंकरराव कणसे, केतन जाधव यासह विविध मान्यवर उपस्थित होते. साळुंखे म्हणाले की, बुध्दी ही माणसाला लाभलेली अनमोल देणगी आहे. विचार करण्याची शक्ती फक्त माणसाकडेच आहे. हे विचार एकमेकांना देता येतात. त्यामुळे संस्कृतीचा, भाषेचा विकास झाला आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की, निसर्गाने आपणाला केवढे वैभव दिले आहे. त्याचाही स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. पशु-पक्ष्यांकडूनही आपण बरेच काही शिकू शकतो, पण त्यासाठी दृष्टी हवी. प्रारंभी ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत साहित्यिक, विद्यार्थी, नागरिक, रसिक सहभागी झाले होते. डॉ. शरद अभ्यंकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.
स्वागताध्यक्ष मधुकर माने यांनी प्रास्ताविक केले. प्रा. हिंंदुराव पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. केशवराव माने यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी माधवराव माने, प्रा. प्रकाश बोधे, अरुण माने, धैर्यशील माने, अनंतराव माने, भरत शहा, सर्जेराव जाधव, सीताराम माने, रामदास निकम, शिवाजी शिंदे, संजय लोहार यासह कवी, साहित्यिक, नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाचनाबरोबर लिखाणही करावे
डॉ. शरद अभ्यंकर म्हणाले की, वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी घरोघरी उत्कृष्ट ग्रंथसंपदा असली पाहिजे. या आवडीतूनच काय वाचावे, याचे निश्चित असे भान येईल. वाचनाबरोबर थोडे लिखाणही करता आले पाहिजे. यातूनच उद्याचे कवी, साहित्यिक निर्माण होण्यास मदत होईल. अलिकडे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.