रिक्षावाल्यांचा विरोध; पण पोलिसांचा ‘प्रयोग’!

By admin | Published: September 11, 2015 09:25 PM2015-09-11T21:25:00+5:302015-09-11T23:38:31+5:30

एकच गेट ‘नको रे बाबा...’ : संयुक्त बैठक तोडग्याविना; रिक्षा व्यावसायिकांकडून ‘दोन गेट’चा पर्याय; उद्या होणार अंतिम निर्णय

Rickshaw pullers protest; But the 'experiment' of the police! | रिक्षावाल्यांचा विरोध; पण पोलिसांचा ‘प्रयोग’!

रिक्षावाल्यांचा विरोध; पण पोलिसांचा ‘प्रयोग’!

Next

\कऱ्हाड : येथील बसस्थानक परिसरात एकच रिक्षा गेट करण्यास सर्वच संघटनांचा विरोध आहे. येथे दोन गेट करावीत, असा पर्याय संघटनांनी सुचविला आहे. मात्र, तरीही ‘प्रयोग’ म्हणून शनिवारी रात्रीपर्यंत रिक्षावाल्यांनी एकाच गेटवर व्यवसाय करण्याची सूचना पोलिसांनी दिली आहे. रविवारी सकाळी याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन पोलीस व परिवहन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सकाळी रिक्षा व्यावसायिक, पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत बसस्थानक परिसरात किती रिक्षा गेट असावीत, या विषयावर चर्चा झाली. परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक अमोल खोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शहरातील सर्व रिक्षा गेटचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य व सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता व येथील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी रिक्षाचे एकच गेट असावे, अशी प्रशासनाची भूमिका आहे. नागरिकांचीही तशी मागणी आहे. सर्वसमावेशक, सर्वमान्य व सर्वांच्या हिताचा निर्णय घेण्याची प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांनी या प्रश्नाबाबत आपली मते मांडावीत, असे आवाहन यावेळी निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले. त्यावर रिक्षा व्यावसायिकांनी एकाच गेटमुळे होणारे तोटे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
रिक्षा व्यावसायिक विजय माने म्हणाले, ‘एकच गेट तयार केल्यामुळे येथे रिक्षांची मोठी रांग लागत आहे. सुमारे १७५ मीटर लांबपर्यंत रिक्षा उभ्या राहत आहेत. नंबरप्रमाणे चालकाला रिक्षा ढकलावी लागते. जे चालक तरुण आहेत, त्यांना त्याचा त्रास होत नाही; मात्र बहुतांश चालक ज्येष्ठ आहेत. त्यांना रिक्षा ढकलत पुढे नेणे शक्य नाही. मुळातच कऱ्हाड शहरात रिक्षाचा शेअरिंगचा व्यवसाय ९० टक्के आहे. स्पेशल भाडे मिळणे मुश्किल असते. अशा परिस्थितीत चालकांना प्रवासी मिळविण्यासाठी धडपडावे लागते. एकाच गेटमुळे व्यावसायिक कित्येक तास रांगेत उभा राहिला तरी त्याला नंबर येत नाही. त्याचे आर्थिक नुकसान होत आहे. गेटवर रिक्षात तीन प्रवासी आल्याशिवाय रिक्षा नेता येत नाही. त्यामुळे प्रवासी रिक्षा भरायची वाट पाहत नाहीत. ते आजूबाजूला असलेल्या वडापच्या गाड्यातून निघून जातात. त्यामुळे प्रशासनाने रिक्षा व्यावसायिकांची बाजू समजून घेऊन एक ऐवजी ‘धर्मवीर’ व ’अजंठा’ अशी दोन रिक्षा गेट सुरू करावीत.’
विजय माने यांच्याबरोबरच मकसुद बागवान यांनीही रिक्षा व्यावसायिकांचे काही प्रश्न मांडून ‘एक गेट’ला विरोध केला. बसस्थानक परिसरात दोन गेट करावीत, अशी मागणी बागवान व अन्य व्यावसायिकांनी केली. याला उत्तर देताना पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील म्हणाले, ‘एकच रिक्षा गेट हा वाहतुकीला शिस्त लावण्याचा पहिला टप्पा आहे. प्रयोग म्हणून आपण याकडे पाहत आहोत. रिक्षा व्यावसायिकांचे नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही. मात्र, भविष्याचा विचार करता, हे होणे गरजेचे आहे. सध्या बसस्थानकाच्या इमारतीचे काम सुरू आहे.
येत्या दोन वर्षांत ते पूर्ण होईल. त्यावेळी बसस्थानकातून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना एकच दरवाजा असेल. तेथूनच प्रवासी बाहेर येतील आणि त्याचा फायदा रिक्षा व्यावसायिकांना होणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी तात्पुरता विचार न करता भविष्यातील घडामोडी लक्षात घ्याव्यात.’
पोलीस निरीक्षक पाटील यांनी प्रशासनाची भूमिका सांगितल्यानंतर रिक्षा व्यावसायिकांनी दोन गेटचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला. मात्र, एका गेटमुळे होणारे फायदे, तोटे अद्याप लक्षात आले नसल्यामुळे शनिवारी रात्रीपर्यंत व्यावसायिकांनी एकाच गेटवर व्यवसाय करावा. रविवारी सकाळी गेट किती असावी, याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे वरिष्ठ निरीक्षक पाटील व परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे अखेरच्या क्षणी अनेक व्यावसायिक नाराज होऊन विश्रामगृहातून बाहेर पडले.
या बैठकीस गफार नदाफ, माजी नगरसेवक सादिक इनामदार, मुसा शेख, रमजान कागदी, सुनील पाटील यांच्यासह कऱ्हाडमधील विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, सभासद व चालक, मालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)


‘गेट’चा मालक उजव्या हाताला !
गेट आमचं आणि तुमचं ? या विषयावर काही रिक्षा व्यावसायिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तसेच काही व्यावसायिकांनी बोलताना ‘आमच्या गेटवर’ असा उल्लेख केला. त्यावेळी निरीक्षक बी. आर. पाटील यांनी ‘कोणतंही रिक्षा गेट कोणाच्याही मालकीचं नाही,’ असे सुनावले. तसेच परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस यांच्याकडे हात करीत ‘गेटचे मालक माझ्या उजव्या हाताला बसलेत. परिवहन अधिकाऱ्यांनी प्रवाशांची सोय लक्षात घेऊन गेटसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोणीही गेटला आपले कूळ समजू नये. गेट माझं आणि येथील नेता म्हणजे गेटचा मालक, हा विषय व्यावसायिकांनी डोक्यातून काढून टाकावा,’ अशा शब्दात त्यांनी व्यावसायिकांना खडसावले.

उचलाउचली करणाऱ्यांवर कारवाई
बसस्थानक परिसरात गेटवर रिक्षा लावल्या असताना काहीजण पलीकडील बाजूस प्रवाशांची उचलाउचली करतात, असा मुद्दा एका व्यावसायिकाने उपस्थित केला. मात्र, यापुढे गेटव्यतिरिक्त परिसरामध्ये कोणीही रिक्षा व्यावसायिक प्रवासी घेणार नाही आणि घेतल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपनिरीक्षक अमोल खोंडे यांनी दिले. गेटवरील व्यावसायिकांनी त्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


पोटावर पाय आणू नका !
एकच रिक्षा गेट सुरू केले तर फूटपाथवर रिक्षा लावायच्या का ? जर फूटपाथवर रिक्षा लावल्या तर तेथे फळविक्री किंवा इतर किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी कुठे जायचं? आपल्यासाठी आपण त्यांच्या पोटावर पाय द्यायचा का? असा प्रश्न एका रिक्षा चालकाने उपस्थित केला. मात्र, कोणावरही अन्याय होणार नाही, अशी व्यवस्था करण्यावर आमचा भर असल्याचे निरीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले.


गेटमधील वाद चव्हाट्यावर !
मलकापुरातील रिक्षा कऱ्हाडात आली किंवा कऱ्हाडच्या गेटवरील रिक्षा घेऊन मलकापुरात गेली तर तेथील स्थानिक गेटवर संबंधित रिक्षा लावून दिली जात नाही. दादागिरी केली जाते. त्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतात, असा प्रश्न एका रिक्षा चालकाने मांडला. या प्रश्नावर काही गेटचे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी बैठकीतच एकमेकांवर आरोप केले. मात्र, हा विषय वेगळा असल्याचे सांगून त्यावर ठोस उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन निरीक्षक पाटील यांनी यावेळी दिले.
गेटवर अडवणूक करणाऱ्यांवर गुन्हा...
कऱ्हाड, मलकापूर, सैदापूर, विद्यानगर परिसरातील कोणत्याही गेटवर चालक आपली रिक्षा लावू शकतो. त्यासाठी कोणाच्या परवानगीची किंवा कोणाला विचारण्याची गरज नाही. मात्र, एखाद्या चालकाला कोणी गेटवर रिक्षा लावण्यास अटकाव करीत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा निरीक्षक पाटील यांनी दिला. तसेच तशा नोटीस बजावण्याचे आदेशही त्यांनी उपनिरीक्षक अमोल खोंडे यांना दिले.
दोन गेटच्या बाजूने बहुमत !
बसस्थानक परिसरात किती रिक्षा गेट असावीत, याविषयी बैठकीत चर्चा झाल्यानंतर अखेरपर्यंत कोणताच सर्वमान्य तोडगा निघाला नाही. अखेर निरीक्षक पाटील यांनी दोन गेटचा पर्याय ज्यांना मान्य आहे, त्यांनी हात वर करावा, असे आवाहन केले. त्यावेळी सर्वच व्यावसायिकांनी हात उंचावून दोन गेटच्या बाजूने कौल दिला. त्यानंतर एका गेटसाठी हात उंचावण्याचे आवाहन केल्यानंतर एकाही व्यावसायिकाने हात उंचावला नाही. त्यामुळे एका गेटचा निर्णय कोणालाच मान्य नसल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Rickshaw pullers protest; But the 'experiment' of the police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.