खुनाचा उलगडा करण्यात ‘रिओ’ ठरला हिरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:40 AM2021-05-13T04:40:09+5:302021-05-13T04:40:09+5:30
सातारा : खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे एका आठवर्षीय लहान मुलाच्या खुनाचा उलगडा करण्यात सातारा गुन्हे अन्वेषण शाखा व शिरवळ ...
सातारा : खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे एका आठवर्षीय लहान मुलाच्या खुनाचा उलगडा करण्यात सातारा गुन्हे अन्वेषण शाखा व शिरवळ पोलिसांना यश आले आहे. हा उलगडा करण्यात सातारा जिल्हा पोलीस दलातील ‘रिओ’ श्वानाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या हालचालींचा वेध घेत पोलिसांनी अवघ्या दोनच तासांत खूनप्रकरणी एका १० वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. न्यायालयाचे त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्याचे आदेश दिले.
याबाबतची घटनास्थळावरून व शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नायगाव येथील प्रमोद गुजर यांच्या मालकीच्या शेतामध्ये मूळ कर्नाटक राज्यातील चन्नाप्पा जमादार हे कुटुंबीयांसमवेत शेतमजूर म्हणून कामासाठी आहेत. सोमवारी (दि. १०) दुपारी तीन वाजता प्रशांत जमादार (वय ८) व त्याचा मोठा भाऊ घरात रद्दी आणण्याकरिता गेले होते. घरी गेल्यानंतर प्रशांतने ‘घरात काही दिवसांपूर्वी तूच आग लावली आहेस,’ असे सांगत ‘मी तुझे नाव पप्पांना सांगणार आहे,’ असे मोठ्या भावाला सांगितले. या कारणावरून दोघा भावंडांत झटापट झाली. काही वेळानंतर प्रशांत अंगणातील कुऱ्हाड हाती घेऊन पपईच्या बागेकडे पळत सुटला. यानंतर मोठ्या भावाने पळत जाऊन त्याच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेतली होती. कुऱ्हाड हिसकावताना पुन्हा दोघांमध्ये झटापट झाली. ‘मी तुझे नाव पप्पांना सांगणार आहे’ असे प्रशांत मोठ्या भावाला म्हणाला.
यावेळी मागचा-पुढचा विचार न करता मोठ्या भावाने प्रशांतच्या गळ्यावरच कुऱ्हाडीचा घाव घातला. यामध्ये प्रशांत जमादार याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर कुऱ्हाड पपईच्या बागेत टाकून प्रशांतच्या मोठ्या भावाने घटनास्थळावरून धूम टोकली. ही घटना उघडकीस आल्यानंतर फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, प्रवीण फडतरे, शरद बेबले यांनी १० वर्षीय अल्पवयीन मुलाकडे विचारणा करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, पोलिसांनी सातारा येथील रिओ श्वानाला व ठसेतज्ज्ञांना पाचारण केल्यानंतर रिओ हा १० वर्षीय अल्पवयीन मुलाकडे सातत्याने जाऊ लागला. रिओ श्वानाच्या या हालचालींचा वेध घेत पोलिसांनी अल्पवयीन मुलाला आपल्या कवेत घेतले अन् त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. अल्पवयीन मुलाने झालेल्या प्रकाराचा उलगडा करीत खुनाची कबुली दिली. संबंधित मुलाला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेत सातारा येथील बाल न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्याचे आदेश दिले. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश हजारे हे करीत आहेत.