साताऱ्यातील पुसेसावळीत दंगल: नेटवर्क बंद, व्यवहार ठप्प; नेटकरी अस्वस्थ..पालकवर्ग खूश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:52 PM2023-09-13T12:52:43+5:302023-09-13T12:54:32+5:30
रेल्वे प्रवाशांना मात्र नेटवर्कचा कोणताही परिणाम जाणवला नाही
संतोष खरात
लोणंद : खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात तीन दिवसांपूर्वी झालेल्या राड्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली असली तरी सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा गेल्या दोन दिवसापासून बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.
काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून पुसेसावळीत रविवारी (दि.१०) रात्री उशिरा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. जाळपोळ झाल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. स्थानिक पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा ७२ तासांसाठी बंद ठेवली होती.
याचा परिणाम सर्वसामान्य नागरीकांसह, व्यापारी वर्ग, पतसंस्था, वर्क फ्रॉम होम करणारे नोकरदारांपासून शालेय विद्यार्थ्यांवर झाला असून नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या नागरीकांची मोठी तारांबळ उडाली. काही बँका वगळता अनेक बँकाचे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले. नेट बंद असल्याने नेटकऱ्यांना मात्र चैन पडत नव्हता.
नेट बंदमुळे मुले मैदानात
घरातील लहान मुलही नेट नसल्याने मैदानाकडे खेळावयास बाहेर पडली. रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर ऑनलाईन गेमींग व यु ट्यूब पाहणारा युवा वर्ग मोबाईल पासून दूर होता. यामुळेच गेली दोन दिवस शाळकरी मुले वेळेवर झोपत असल्याने पालक वर्ग खूश होता.
रेल्वे सेवा अखंडपणे सुरळीत
रेल्वे प्रवाशांना मात्र नेटवर्कचा कोणताही परिणाम जाणवला नाही. कारण भारतीय रेल्वेचे नेटचे जाळे स्वतंत्र असल्याने कराड, सातारा, कोरेगाव, राहिमतपूर, वाठार, लोणंद या स्थानकावर वायफाय सुरू होते.