अजिमशहाच्या नावावरून ‘शहापूर’चा उदय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:25+5:302021-01-17T04:33:25+5:30
(संडे स्टोरी) सचिन काकडे प्रत्येक गावाच्या नावामागे कोणता न कोणता इतिहास लपला आहे. कालौघात काही गावांना व्यक्तींची नावे ...
(संडे स्टोरी)
सचिन काकडे
प्रत्येक गावाच्या नावामागे कोणता न कोणता इतिहास लपला आहे. कालौघात काही गावांना व्यक्तींची नावे मिळाली तर काहींना मंदिर, देव-देवता व तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार नावे मिळत गेली. जिल्ह्यात अशी शेकडो गावे असून, त्यांना इतिहासाची किनार आहे. सातारा शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वसलेल्या ‘शहापूर’ गावाच्या नावलाही तब्बल तीनशे वर्षांचा इतिहास आहे.
अजिंक्यतारा ही मराठा साम्राज्याची चौथी व शेवटची राजधानी. हा किल्ला राजधानी म्हणून घोषीत होण्यापूर्वी बादशाह औरंगजेब हा अजिंक्यतारा किल्ल्यावर चालून आला होता. किल्ला ताब्यात घेण्यासाठी त्याने सध्याच्या करंजे येथे तर त्याचा मुलगा अजिमशहा याने शहापूर प्रांतात छावणी उभारली होती. या अजिमशाहाच्या नावावरूनच या गावाला पुढे ‘शहापूर’ असे नाव मिळाले आणि हीच या गावाची ओळख बनली, अशी आख्यायिका सांगितली जाते.
अजिंक्यतारा काबीज करण्यासाठी औरंगजेबाच्या सैन्याने किल्ल्याच्या दिशेने तोफगोळ्यांचा मारा केला होता. मात्र, तोफेची दिशा व गोलंदाजांचा अंदाज चुकल्याने तोफ गोळे औरंगजेबाच्या छावणीतून थेट अजिमशहाच्या छावणीत पडू लागले. अजिमशहाने स्वार पाठवून गोलंदाजांना याची कल्पना दिली. यानंतर तोफेची दिशा बदलून पुन्हा किल्याच्या दिशेने मारा करण्यात आला. अनेक प्रयत्न करुनही किल्ला काबीज न झाल्याने अजिमशहाने किल्लेदाराशी तहाची बोलणी सुरू केली आणि त्याला यश आले. किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला. अजिमशहामुळे तह सफल झाल्याने या किल्ल्याला ‘अजिमतारा’ असं नाव देण्यात आलं. हा ‘अजिमतारा’ पुढे ‘अजिंक्यतारा’ म्हणून ओळखला जावू लागला, असंही सांगितलं जातं.
अजिमशहाच्या नावावरून किल्ल्याला ‘अजिमतारा’ व त्याच्या छावणीमुळे गावाला ‘शहापूर’ हे नाव मिळालं. सुमारे तीनशे वर्षांपासून या गावाला शहापूर म्हणूनच ओळखलं जात आहे. पूर्वी शहापूर, डबेवाडी व जकातवाडी ही तिन्ही गावे एकत्र होती. चाळीस वर्षांपूर्वी शहापूरमधून डबेवाडी व जकातवाडी ही गावे विभक्त झाली. ७५० लोकसंख्या व २५० उबंºयांच्या या गावात आज इतिहासाच्या पाऊलखुणा जरी अस्तित्वास नसल्या तरी त्याच्या नावामागे लपलेला इतिहास मात्र रंजक आहे.
(कोट)
शहापूरच्या नावामागे इतिहास आहे. मात्र, आजही अनेकांना हा इतिहास माहित नाही. एकेकाळी या गावात अजिमशहाची छावणी होती. त्याच्या नावावरून या गावाला शहापूर हे नाव मिळाले असे जुने जानकारसांगतात.
- सुभाष माने, शेतकरी, शहापूर
फोटो : मेल