प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:26 AM2021-07-20T04:26:06+5:302021-07-20T04:26:06+5:30
सातारा : शहरातील फळ व भाजी विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर केला जात आहे. शहरातील राजवाडा, खण आळी, मोती ...
सातारा : शहरातील फळ व भाजी विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर केला जात आहे. शहरातील राजवाडा, खण आळी, मोती चौक, देवी चौक, पाचशे एक पाटी, जुना मोटर स्टॅँड परिसरातील अनेक हातगाडीधारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करु लागले आहेत. कोरोनामुळे पालिकेकडून गेल्या दीड वर्षात एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे व्यापारी, विक्रेते निर्धास्त झाले आहेत. ही कारवाई पुन्हा सुरू करणे गरजेचे बनले आहे.
सदर बझार येथे डुकरांचा सुळसुळाट
सातारा : शहरातील सदर बझार परिसरात डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, चिकुनगुनियाच्या साथीने थैमान घातले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे गंभीर बनला असताना आता डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने त्यात अधिकच भर पडली आहे. पालिकेने वराह पालन करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मोकाट डुकरे पकडून ती कोंडवाड्यात सोडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाहनधारकांची कसरत थांबेना
सातारा : शहरातील अर्कशाळा ते शाहूपुरी चौक या मार्गाची खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हद्दवाढीमुळे हा भाग आता सातारा पालिकेत समाविष्ट झालेला आहे. त्यामुळे या भागाचा विकास करणे पालिकेला क्रमप्राप्त आहे. प्रशासनाने या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
महाबळेश्वरचा पारा २१ अंशांवर
महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरसह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे थंडीतही वाढ होऊ लागली आहे. हवामान विभागाने सोमवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान २१.१ तर किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. वाढत्या थंडीमुळे घरोघरी कोळशाच्या शेकोट्या पेटू लागल्या असून, नागरिकांमधून उबदार कपड्यांनादेखील मागणी वाढली आहे.