मासळी विकून ऋषिकेश घ्यायचा शिक्षण!
By admin | Published: September 29, 2015 09:56 PM2015-09-29T21:56:54+5:302015-09-30T00:10:35+5:30
नियतीचा घाला : साकुर्डीच्या काटकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर
तांबवे : गणेशोत्सवाच्या काळातच साकुर्डीच्या काटकर कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. शिक्षण घेऊन घरच्या परिस्थितीवर मात करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा ऋषिकेश नियतीने हिरावून नेला. त्यामुळे काटकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
साकुर्डी येथील ऋषिकेश अशोक काटकर (वय १७) हा गाडगे महाराज महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शुक्रवार, दि. २५ रोजी बकरी ईदची सुटी असल्याने तो आपल्या पाच-सहा मित्रांसोबत सकाळी ११ वाजता कोयना नदीवर बंधाऱ्यानजीक असणाऱ्या ज्योतिबा पाणवठ्यावर पोहण्यासाठी गेला. नदीमध्ये पाणी कमीच होते. त्याला पोहताही येत होते. मित्रही नदीमध्ये पोहत असताना ऋषिकेश नदीमध्ये जास्त आत गेला. तेथे पाण्याचा प्रवाह जास्त होता. त्यामुळे ऋषिकेश घाबरला असावा. त्यानंतर गटांगळ्या खाऊन तो बुडाला. ऋषिकेश नदीत बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी घरी दिली. त्यावेळी युवक व ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली.
ऋषिकेश हा अशोक यांचा सर्वात मोठा मुलगा. ऋषिकेशच्या धाकट्या भावाचे नाव ऋतिकेश आहे. अशोक काटकर हे साकुर्डीतील अशोकराज कंपनीच्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. घरची परिस्थिती बेताची असून शेतजमीनही अल्प आहे. त्यामुळे इतर कामे करून घर चालत होते. ऋषिकेश शिक्षण घेण्याबरोबरच अनेकवेळा बाजारामध्ये मासे विकत बसायचा. त्यातून कमावलेल्या पैशातून तो शिक्षण घेत होता.
शिक्षण घेऊन मोठे व्हायचे आणि घरची परिस्थिती बदलायची, असे अनेकवेळा त्याने आपल्या मित्रांना बोलून दाखविले होते. मात्र, नियतीने त्याला कुटुंबीयांपासुन हिरावून घेतल्याने त्याच्या आई-वडिलांसह लहान भाऊही खचला आहे. त्याच्या अचानकपणे निघून जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
अखेर जेवण राहिलंच!
ऋषिकेश ज्यादिवशी पोहायला गेला, त्यावेळी आईने त्याला जेवणाचे ताट केले होते. आई त्याला जेवून जा म्हणून सांगत होती. मात्र, मी आंघोळ करून लगेच परत येतो. आलो की जेवण करतो, असे म्हणून ऋषिकेश घरातून निघून गेला तो परत आलाच नाही. आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
आधाराची गरज
ऋषिकेशचा लहान भाऊ ऋतिकेश हा इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेत आहे. तोही आपल्या दादाच्या जाण्याने खचला आहे. या कुटुंबाला आता आधाराची व मदतीची गरज आहे.