वाढत्या उष्णतेचा टोमॅटोला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:37 AM2021-04-15T04:37:57+5:302021-04-15T04:37:57+5:30
कोपर्डे हवेलीसह परिसरातील काही गावांमध्ये शेतकरी टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. इतर पिकांच्या तुलनेत टोमॅटोला उत्पादन खर्च जादा लागतो. ...
कोपर्डे हवेलीसह परिसरातील काही गावांमध्ये शेतकरी टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. इतर पिकांच्या तुलनेत टोमॅटोला उत्पादन खर्च जादा लागतो. सुमारे एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च शेतकरी घालतात. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात टोमॅटो लागवडीचे क्षेत्र जास्त असते, शिवाय या तापमानात पीक घेणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असते. गत काही वर्षांच्या तुलनेत प्रथमच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाली. गत आठ ते दहा दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या लागणी केल्या आहेत. त्यामुळे ही रोपे उन्हाच्या तडाख्याने माना टाकत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मलचिंग पेपरचा वापर केला आहे. त्यामुळे पिकांना तापमानाचा त्रास कमी दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे पिकांच्या वाढीस अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठिबकद्वारे पाणी देणाऱ्या टोमॅटो पिकाला तापमानाचा धोका कमी असतो, तर पाटपाणी असेल, तर तुलनेत धोका जास्त असतो. कोपर्डे हवेली परिसरात गत आठ ते दहा दिवसांत टोमॅटोच्या लागणी झाल्या आहेत. त्यामध्ये कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे, नडशी, शिरवडे, वडोली निळेश्वर, पार्ले आदी गावांचा समावेश आहे. मे महिन्यातील जेवढी उष्णता असते, तेवढीच उष्णता सध्या मार्च जाणवत आहे. टोमॅटोची झाडे कोवळी असल्याने बागा जगविण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान आहे.