सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या, ४८ लोक बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 01:09 PM2021-12-31T13:09:41+5:302021-12-31T13:10:02+5:30
सातारा : जिल्ह्यामध्ये आज, शुक्रवारी कोरोना रुग्णांचा आकडा अचानकपणे दुपटीने वाढला. तब्बल ४८ लोक बाधित आढळले असल्याने जिल्हावासियांची चिंता ...
सातारा : जिल्ह्यामध्ये आज, शुक्रवारी कोरोना रुग्णांचा आकडा अचानकपणे दुपटीने वाढला. तब्बल ४८ लोक बाधित आढळले असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. मुंबई, पुणे, सोलापूर या महानगरांमध्ये देखील संख्येत प्रचंड वाढ झाली. आता साताऱ्यामध्ये देखील रुग्णांची वाढ झालेली आहे. शुक्रवारी २ हजार ५३४ तपासण्या करण्यात आल्या त्यातून ४८ लोक कोरोना बाधित आढळले. कोरोना रुग्ण वाढीचा दर १.८९ टक्के इतका वाढला.
पहिल्या आठवड्यामध्ये रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळते. मागील मंगळवारी १३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर बुधवारी २१, गुरुवारी २१ आणि आता शुक्रवारी ४८ रुग्ण आढळले आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्ह्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. या परिस्थितीमध्ये अचानकपणे जर रुग्ण संख्या वाढली तर रुग्णांची हेळसांड होण्याची शक्यता असून लोकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी अनेक जण अजूनही मास्कचा वापर करत नाहीत. कार्यक्रम, विवाह सोहळे यांना प्रचंड मोठी गर्दी होत आहे.
या परिस्थितीमध्ये मागील लाटेप्रमाणे जर कोरोनाची लाट उसळली तर लोकांना पळता भुई थोडी होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. रात्री साडेनऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश लागू आहेत. कोरोना पासून बचावासाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने चिंतेत भर
जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये पाच तर सातारा तालुक्यामध्ये एक असे एकूण ओमायक्रॉन बाधित सहा रुग्ण आढळून आलेले आहेत. परदेशी प्रवासातून साताऱ्यात आलेल्या लोकांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी बरेच जण कोरोनाबाधित आले त्यांचे नमुने अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत, त्यापैकी सहा जणांचे नमुने ओमायक्रॉन बाधित आले आहेत, अजूनही काही नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे.