पंपावर इंधन तसं साइटवर सिमेंट महागलं !, बांधकामाच्या खर्चात झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 06:57 PM2021-11-17T18:57:48+5:302021-11-17T19:00:32+5:30
बांधकामासाठी लागणारे स्टील, सिमेंट, वाळू, खडी, विटा यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
सागर गुजर
सातारा : इंधन दरवाढीचा परिणाम जसा इतर क्षेत्रांवर झालेला आहे तसाच बांधकाम क्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतो आहे. इंधन दरवाढीमुळे बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले असून, घरांच्या निर्मितीचा खर्चदेखील वाढला असल्याने सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसतो आहे.
बांधकामासाठी लागणारे स्टील, सिमेंट, वाळू, खडी, विटा यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याशिवाय बांधकाम साहित्याच्या वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डिझेलच्या किमती मोठी दरवाढ झाली त्यामध्ये भरीत भर म्हणून वस्तू व सेवा कर परिषदेने बांधकाम साहित्यावरील करामध्ये पाच टक्क्यांवरून १८ टक्के म्हणजे तब्बल १३ टक्क्यांनी वाढ केली त्यामुळे बांधकामाच्या प्रति चौरस फूट खर्चामध्ये सरासरी ३०० रुपयांची वाढ झाली आहे. साहजिकच बाजारात थोडीशी तेजी अनुभवणाऱ्या व्यावसायिकांवर चिंता पसरली आहे. बाजारातील मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे ग्राहकांकडून अधिक दर मिळत नाही आणि बांधकाम खर्च वाढल्यामुळे नफ्यातील घट चुकत नाही, अशी त्यांची अवस्था झालेली आहे. विशेषतः राज्यात नव्याने सुरू झालेल्या बांधकाम प्रकल्पांसाठी हा विषय चिंतेचा आहे.
वित्तीय संस्था अडचणीत सापडल्या पाठोपाठ कोरोनाची साथ पसरली आणि बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. या व्यवसायाचा विकासदर उणे घरामध्ये घसरला आहे, ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने विविध सवलतींचा योजना जाहीर केल्या, त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचा समावेश होता तसेच राज्य सरकारनेही मुद्रांक शुल्क नोंदणी खर्चामध्ये कपात करून या व्यवसायाला दिलासा दिला होता शासनाच्या टेकूवर हा व्यवसाय पुन्हा एकदा सकारात्मक वळणावर येत असतानाच स्टीलचे भाव सरासरी ६६ रुपये प्रतिटन वर गेले.
दीड वर्षांपासून २७४ रुपयांना विकले जाणारे सिमेंटचे पोते ३७० रुपयांवर गेले प्रती घनफूट ४५०० रुपये आकारल्या जाणाऱ्या काँक्रीटचा दर पाच हजार सहाशे रुपयांवर गेले असून, बांधकाम व्यावसायिकांना ग्राहकांच्या पसंतीस दरात घरकुल उपलब्ध करताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. तीन वर्षांपूर्वी असेच बांधकामाचे दर वाढत होते तेव्हा केंद्र सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
अशी झाली आहे बांधकाम साहित्याची दरवाढ
सळई : ६६ रुपये प्रति किलो
सिमेंट बॅग : तीनशे सत्तर रुपये
एसएससी ब्लॉक : ३६०१ घनमीटर
रेडी मिक्स काँक्रिट : ५६०० घनमीटर
कृत्रिम वाळू : ७०८८ प्रति शंभर घनफूट
खडी : ३६२३ प्रति शंभर घनफूट
डिझेल : १०२ रुपये प्रति लिटर
मार्च २०२१चे दर
सळई : ६० रुपये प्रति किलो
सिमेंट बॅग : ३३२ रुपये
एसएससी ब्लॉक : ३२५० घनमीटर
रेडी मिक्स काँक्रिट : ४७५० घनमीटर
कृत्रिम वाळू : ६३०० प्रति शंभर घनफूट
खडी : २५७३ प्रति शंभर घनफूट
डिझेल : ८७ रुपये प्रति लिटर
बांधकाम साहित्याच्या दरात गेल्या एक वर्षात मोठी वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा बांधकाम व्यवसाय उभारी घेत असतानाच साहित्याच्या दरवाढीने प्रति चौरस फूट तीनशे रुपयांचा फटका बसत आहे. ही वाढ सर्वसामान्य नागरिकांना सहन करावी लागणार असल्यामुळे केंद्र शासनाने ही अवास्तव दरवाढ रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. - मजीद कच्छी, सचिव क्रेडाई सातारा
कोरोनाच्या काळात लोकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पहायला मिळते. त्यातच इंधन दरवाढीमुळे घरांच्या किमती कमी ठेवणे बांधकाम व्यावसायिकांना शक्य होत नाही. नोकरीतील असुरक्षिततेमुळे घरासारख्या मोठ्या खर्चात पडण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक वस्तू, छोटी वाहने खरेदी केली जातात. इंधन दरवाढ कमी झाली तरी वस्तूंवर वाढलेला जीएसटी कर हाही कमी होणे गरजेचे आहे. - विवेक निकम, उपाध्यक्ष, क्रेडाई, सातारा