खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:40 AM2021-03-27T04:40:09+5:302021-03-27T04:40:09+5:30
वरकुटे-मलवडी : वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीने पछाडलेल्या सर्वसामान्य जनतेच्या हातचा कामधंदा हिरावून घेतला आहे. मागील सहा महिन्यांपासून चढलेले खाद्य तेलाचे ...
वरकुटे-मलवडी : वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीने पछाडलेल्या सर्वसामान्य जनतेच्या हातचा कामधंदा हिरावून घेतला आहे. मागील सहा महिन्यांपासून चढलेले खाद्य तेलाचे दर नवनवीन उच्चांक गाठत आहेत. या महिन्यांत खाद्य तेलाच्या दरात २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीन तेल १४२ रुपये किलो, शेंगदाणा तेल १९०, तर सनफ्लॉवर तेलाचा दर १७५ रु प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले आहे.
खाद्यतेलाच्या या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट पार कोलमडले आहे. सर्वसामान्य, हातावर पोट भरणाऱ्या जनतेची तारांबळ उडाली आहे.
राज्यात परतीच्या पावसाने आणि बदलत्या वातावरणामुळे तेलबियांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे ठोक आणि किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे दर चांगलेच भडकले आहेत. याशिवाय लग्नसराईमुळे तेलाला जास्त मागणी असल्यामुळे खाद्यतेलाचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपासून सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफूल आदी तेलांच्या किमतीत प्रतिकिलोमागे प्रचंड वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून तेलाच्या किंमती सतत वाढतच आहेत. खाद्यतेलात ऑक्टोबर ते मार्च दरम्यान ७० ते ८० रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे.
सर्वाधिक वाढ शेंगदाणा तेलात झाली आहे. शेंगदाणा तेल मागील चार महिन्यांत ८० रुपयाने वाढल्याने, तेलाच्या विक्रीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे किराणा मालाचे विक्रेतेही अडचणीत सापडले आहेत. हॉटेल व्यावसायिकांना दरवाढीचा अधिक फटका बसत आहे. पूर्वीच मंदी असल्यामुळे त्यात ग्राहकांची संख्या कमी आहे. त्यात मालावर अधिक खर्च होत आहे. खाद्य तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने यावर काहीतरी तोडगा काढून खाद्यतेलाचे दर कमी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
कोट :
या वाढत्या महागाईला, गोडतेलाच्या दरात तर दिवसोंदिवस भयानक झरवाड झाली आहे. शेंगदाणा तेल तर मागील चार ते पाच महिन्यात ८० ते ९० रुपयांनी महागल्याने विकत घ्यायच्या आधी खूप विचार करावा लागतोय. गोरगरिबांनी खायचं काय? संबंधित विभागाने जाणीवपूर्वक विचार करून महागाई कमी केली पाहिजे.
- महादेव काटकर,
सायकल दुकानदार, वरकुटे-मलवडी.