औद्योगिक वसाहतीत कोरोना संसर्गाचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:11+5:302021-07-02T04:26:11+5:30
कऱ्हाड : तासवडे, ता. कऱ्हाड येथील औद्योगिक वसाहतीत हजारो कामगार काम करीत असून, याठिकाणी कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे ...
कऱ्हाड : तासवडे, ता. कऱ्हाड येथील औद्योगिक वसाहतीत हजारो कामगार काम करीत असून, याठिकाणी कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे या कामगारांना कोरोना महामारीच्या काळात वाऱ्यावर न सोडता कामगारांसाठी लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे आहे.
दरम्यान, कामगारांच्या लसीकरणाबाबत कऱ्हाड दक्षिण शिवसेना उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनीही प्रशासनाकडे मागणी केली आहे. मात्र, अद्याप त्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.
कऱ्हाड तालुक्यात तासवडे येथे मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अनेक नामवंत कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये पाटण, कऱ्हाड, सातारा, काशीळ, वारुंजी, खोडशी, वहागाव व मसूर परिसरातून हजारो कामगार काम करीत आहेत. गत दीड वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट आले आहे. सलग दोन वर्षे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेक कंपन्या बंद झाल्या. हजारो कामगार घरी बसून राहिले. अनेक कामगारांना कोरोनाची लागण झाली. काहींना आपल्या जवळची माणसे गमवावी लागली.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. अनेक कंपन्या सध्या पूर्ववत सुरू होत आहेत. मात्र, कंपन्यांमध्ये गर्दी न करता काम करणे अशक्य आहे. कामगार सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचे लसीकरण करून घ्यावे.
- चौकट
उंब्रज आरोग्य केंद्राकडे पाठपुरावा
तासवडेच्या औद्योगिक वसाहतीमधील काही उद्योजकांनी कामगारांच्या लसीकरणासाठी उंब्रज आरोग्य केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला आहे. कामगारांना लवकरात लवकर लस देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अद्याप त्याला यश आले नसले तरी त्याची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने याठिकाणी लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी कोणतीही मदत किंवा यंत्रणा लागणार असेल तर आम्ही देऊ, अशी प्रतिक्रिया जितेंद्र जाधव यांनी दिली आहे.