सुरक्षितता अन् सुविधांनी ठोसेघर पर्यटकांसाठी सज्ज-शंकरराव चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 08:20 PM2019-07-08T20:20:49+5:302019-07-08T20:21:57+5:30
ठोसेघर धबधबा बघायला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे त्याचा नावलौकिक टिकविण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. - शंकरराव चव्हाण, अध्यक्ष, ठोसेघर वनव्यवस्थापन समिती
प्रगती जाधव-पाटील ।
उंचावरून फेसाळत कोसळणारा ठोसेघरचा धबधबा पाहण्यासाठी आता पर्यटकांची पावले याकडे वळू लागली आहेत. गेल्या कित्येक वर्षात पर्यटकांच्या अपघाताचे गालबोट लागले नाही, हे व्यवस्थापन समितीचे यश म्हणता येईल. वर्षभर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा आणि सुविधांचा विचार करून यंदा केलेल्या उपाययोजनांविषयी ठोसेघर वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष
शंकरराव चव्हाण यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद..!
प्रश्न : पर्यटकांसाठी यंदा कोणत्या विशेष सोयी केल्या आहेत?
उत्तर : ठोसेघर धबधब्याला भेट द्यायला येणारे पर्यटक येथे भिजण्याचाही मनमुराद आनंद घेतात; पण त्यानंतर त्यांना चेंजिंग रुमची सोय नव्हती. यंदा महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र चेंजिंग रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेकदा सोबत आणलेला डबा खायला पर्यटकांना बसता येत नाही. अशांसाठीही स्वतंत्र बैठकव्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या हॉलमध्ये पर्यटक स्नेह भोजनाचा आनंद घेऊ शकतात. ठोसेघर धबधब्याविषयी नवीन माहिती दर्शविणारे व्हिडिओ डॉक्युमेंटरीही पर्यटकांना पाहता येणार आहे.
प्रश्न : येणाºया पर्यटकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
उत्तर : ठोसेघर वनव्यवस्थापन समिती दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. मात्र, येथे येणाºया पर्यटकांनी निसर्गात वावरतानाचे भान ठेवणे आवश्यक आहे. फोटो आणि सेल्फीच्या मोहापायी आपला जीव धोक्यात घालण्याचे टाळावे. ठोसेघरची माती घसरडी आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत येथे चालणं जिकिरीचं असतात. त्यातच जर एखाद्या पर्यटकाने मद्यपान केले तर त्याचा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे येथे येताना मद्यपान करणं टाळावं. गेल्या काही वर्षांत पर्यटकांनीच याबाबत स्थानिकांना सांगितल्याने, यंदा पोलीस यंत्रणाही सजग झाली आहे.
डोम कॅमेरा
धबधब्याकडे जोणाºया पर्यटकांच्या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पार्किंग परिसरात डोम कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पार्किंगमध्ये होणाºया छोट्या-मोठ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणं सहज शक्य होणार आहे. यामुळे चोरी आणि गाड्यांचे होणार नुकसान टाळणं व्यवस्थापन समितीला सहज शक्य होणार आहे.
पोलिसांची गस्त
धबधबा पाहायला येणारे अनेक परगावचे पर्यटक शनिवार आणि रविवारी येतात. या दिवसांत वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही पावले उचलली जात आहेत.
नवा छोटा स्पॉट
ठोसेघर धबधबा पाहण्याबरोबरच याच परिसरातून वाहणाºया एका छोट्या धबधब्याचा शोध व्यवस्थापन समितीला लागला आहे. हा छोटा धबधबा यंदा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनणार असल्याचे मानलं जात आहे.