सांडपाणी साचल्याने आरोग्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:39 AM2021-04-27T04:39:59+5:302021-04-27T04:39:59+5:30
गोळेश्वर ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या शंभू महादेवनगर व मातोश्रीनगर येथील इमारतीमधील तसेच काही घरातील सांडपाणी अक्षरश: रस्त्यावरून वाहू लागले आहे ...
गोळेश्वर ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या शंभू महादेवनगर व मातोश्रीनगर येथील इमारतीमधील तसेच काही घरातील सांडपाणी अक्षरश: रस्त्यावरून वाहू लागले आहे तसेच रस्त्याकडेला साइडपट्टी नसल्याने पाणी साचून राहत आहे. त्यामुळे डासांचा उपद्रवही वाढला आहे. गत अनेक वर्ष या रस्त्याची साधी डागडुजीही झालेली नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावरील दिवेही गायब आहेत. स्वच्छतेअभावी अनेकदा रोगराई पसरत आहे. अशा एक ना अनेक समस्यांना परिसरातील ग्रामस्थ तोंड देत आहेत.
कऱ्हाड-कार्वे रस्त्याकडेला शंभू महादेव नगर व मातोश्रीनगर वसाहत २०१० साली निर्माण झाली. याठिकाणी सुमारे एक हजार लोकसंख्या असून, मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. रस्त्यावरील सांडपाणी रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने रस्त्याकडेलाच आता शोषखड्डा खणला आहे. मात्र, त्यामध्ये पाणी साचून राहू लागल्याने समस्येत भरच पडत आहे. पावसाळा असो अथवा नसो सांडपाण्यामुळे रस्त्यावर घाण पाणी दिसणारच, अशी येथील परिस्थिती आहे. तहसीलदारांसह गटविकास अधिकारी, राज्याचे नगरविकास राज्यमंत्री यांना निवेदन देत ग्रामस्थांनी आपली कैफियत मांडली आहे. ठिकठिकाणी निवेदनेही देण्यात आली असून, या निवेदनावर प्रकाश पाटील, संदीप जाधव, रामकृष्ण पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत.