धोका पत्करू... पण सेल्फी काढूच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 11:52 PM2018-08-05T23:52:38+5:302018-08-05T23:52:42+5:30
सातारा/पेट्री : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. हे धबधबे अन् हिरव्यागार डोंगररांगा पर्यटकांना आकर्षित करू लागल्या आहेत. असे असले तरी दुसरीकडे काही अतिउत्साही पर्यटक व युवक धोक्याकडे दुर्लक्ष करून सेल्फी काढण्याचे धाडस दाखवित आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी सेल्फीमुळे अनेक युवकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे पर्यटकांनी प्रामुुख्याने युवकांनी जीवावर उदार होऊन सेल्फीचा मोह टाळावा, अशी प्रतिक्रिया सातारकरांमधून उमटत आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे डोंगररांगा हिरव्यागार झाल्या आहेत. महाबळेश्वर, कोयना, ठोसेघर, भांबवली आदी ठिकाणचे धबधबेही पूर्ण क्षमतेने कोसळू लागले आहेत. अशा या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांची पावले जिल्ह्याकडे वळू लागली आहे. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक व हुल्लडबाज युवकांमुळे अनुचित घटनाही घडू लागल्याने याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.
कास तलावाच्या पाण्यात फोटोसेशन करण्यापासून ते यवतेश्वर घाटातील संरक्षक कठडे व दगडांवर उभे राहून सेल्फी काढताना पर्यटक नजरेस पडत आहेत. जीवावर उदार होऊन सेल्फी काढण्याचा मोह युवकांना आवरता येत नाही. यातून एखादी विपरित घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न सातारकरांमधून उपस्थित केला जात आहे. सध्या डोंगररांगा व दगडी पाऊस तसेच शेवाळामुळे घसरट्या झाल्या आहेत. यावरून चालताना पाय घसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. मात्र, या धोक्याकडे दुर्लक्ष करून सेल्फी व फोटोसेशनसाठी तरुणाईची धडपड पाहावयास मिळत आहेत.
सेल्फी काढताना सेफ तर आहात ना !
यवतेश्वर घाटात धबधब्यासमोरील संरक्षक कठड्यानजीक असणाऱ्या मोठ्या दगडावर बहुतांशी पर्यटक उभे राहून फोटोसेशन तसेच सेल्फी काढताना दिसत आहेत. या दगडाखाली मोठी दरी असून, या ठिकाणचा अंदाज न आल्यास पाय घसरून मोठा अनर्थ होऊ शकतो. यामुळे सेल्फी काढताना आपण सेफ तर आहोत ना? याची पर्यटकांनी खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.
महाबळेश्वरमधील पॉर्इंट सुरक्षेसाठी बंद...
महाबळेश्वर येथील ब्रिटिशकालीन पॉर्इंट हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. परंतु मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरसह पाचगणीत काही पॉर्इंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. वनविभागाच्या वतीने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दरवर्षी हे पॉर्इंट बंद केले जातात. पाचगणीत टेबललॅँड पठारही पावसामुळे घसरटे होते. मात्र, तरीही काही हौशी पर्यटक या पठाराला भेट देऊन फोटोसेशन करताना दिसून येतात.