नदीपात्रातील खड्डे विहिरींपेक्षाही खोल!
By admin | Published: October 18, 2015 10:52 PM2015-10-18T22:52:19+5:302015-10-18T23:33:52+5:30
येरळेतील कृष्णविवरे : बेसुमार वाळू उपशाचे नदीत डोंगर; अवैध वाळूउपसा रोखण्याचा अंबवडेतील युवकांचा निर्धार--आॅन दि स्पॉट...
शेखर जाधव/रशीद शेख --वडूज/औंध
अंबवडे, ता. खटाव येथील येरळा नदीपात्रात बेकायदा वाळू उपशाने विहिरींपेक्षाही खोल खड्डे पडले आहेत. वाळूमाफियांनी पाडलेल्या या खड्ड्यांनी शनिवारी तीन चिमुकल्यांचा बळी घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला केला आहे. नदीपात्रात उभे असलेले वाळूचे भलेमोठे ढिगारे पाहिल्यानंतर खड्ड्यांची खोली किती असेल, याचा पुरावा मिळू शकतो.
अंबवडे-गोरेगाव पूल ते येरळवाडी धरण अशा चार किलोमीटरच्या नदीपात्राची अक्षरश: चाळण झाली आहे. प्रमाणापेक्षा मोठे खड्डे काढून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. २५ ते ३० फुटांचे खड्डे नदीपात्रात तयार झाले आहेत. येरळवाडी धरणाच्या भराव्यापर्यंत वाळूउपसा सुरू आहे. धरणाच्या आजूबाजूला सुरू असलेला वाळूउपसा असाच सुरू राहिला तर भविष्यात धरणाला भगदाड पडून अंबवडेसह परिसरातील गावांचे फार मोठे नुकसान होऊ शकते. तरीही या प्रकाराकडे प्रशासनाची डोळेझाक का? प्रशासन चिमुकल्यांचा जीव जाण्याची वाट पहात होते का, असा संतप्त सवाल अंबवडे ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
या परिसरातील विहिरींना पूर्वी जेवढे पाणी असायचे, तेवढे सध्या दिसत नाही. नदीकाठी विहीर खणली
तर विहिरीला पाणी लागेल, या आशेवर शेतकरी होते; परंतु नदीपात्रात वाळू उपशाने पडलेल्या खड्ड्यांची खोली विहिरींपेक्षाही खोल असल्यामुळे विहिरींना पाणी लागत नाही. अशी स्थिती आहे. वाळू वाहतुकीची वाहनांमुळे शेतीचेही नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारला असता ठेकेदारांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. चोरटी वाहतूक वाळू वाहतूक करण्यांपुढे अनेकदा नमते घ्यावे लागते. परंतु यापुढे आता अंबवडे हद्दीत बेकायदा वाळू उपसा होऊ न देण्याचा निर्धार युवकांनी केला आहे.
मुदत संपूनही वाळू उपसा सुरूच
खड्ड्यात पडून तीन मुलांचा मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी शासकीय वाहनाची तोडफोड केली. हा संताप स्वाभाविकच होता. कारण संबंधित वाळू ठेक्याबाबत ठराव न देण्याचा ग्रामपंचायतीने ठराव करूनही लिलाव जाहीर झाला. ठेकेदाराने वाळू उपशाची मुदत संपूनही वाळूउपसा सुरू ठेवला होता. प्रशासनानेही याकडे डोळेझाक केली, असा आरोप अंबवडे ग्रामस्थांनी केला आहे.
महसूल विभागाचा वरदहस्त?
नदीपात्रात काही ठिकाणी वाळू लिलाव झाले आहेत. तर काही भागात महसूल विभागाच्या वरदहस्ताने खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. वाळूमाफिया व प्रशासन यांची मिलीभगत असल्याने अशा दुर्घटना होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
वाकेश्वरातही खड्ड्यांनी घेतलेला जीव
यापूर्वी वाकेश्वर, ता. खटाव परिसरातील नदीपात्रात वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात एकाला जीव गमवावा लागला होता. मात्र तरीही प्रशासनाचा वाळूमाफियांवर वचक राहिलेला नव्हता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अंबवडेत शनिवारी पुन्हा खड्ड्यांनी तीन चिमुरड्यंचा जीव घेतला.
दिवसभर रानात कष्ट करून रात्री अंग जमिनीला टेकावे म्हटले तर रात्रभर अवैध वाळू वाहतुकीची वाहने सुसाट धावत असतात. वाहनांच्या आवाजाने नागरिकांची झोप उडाली आहे. यापुढे अशी अवैध वाळू वाहतूक आम्ही रोखू.
- सोमनाथ पवार, ग्रामस्थ, अंबवडे
बेकायदा व अवैध वाळू वाहतुकीने अंबवडे-गोरेगाव रस्ता तसेच परिसरातील रस्त्यांचेही
मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे
आम्ही यापुढे सर्व गावातील युवक
अवैध वाहतूक रोखण्यासाठी गस्त घालणार आहोत.
- वैभव पवार, अंबवडे
उत्तर-दक्षिण वाहिनी वळली पश्चिमेकडे!
येरळा नदी ही उत्तर-दक्षिण वाहणारी; परंतु प्रचंड अवैध वाळू उपशामुळे नदीचा मार्ग पश्चिमेकडे वळला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतजमिनी खचू लागल्या आहेत. विहिरी वर आणि नदीपात्र खाली असे चित्र पाहायला मिळत आहे.
वाळूमाफियांची दादागिरी
येरळा नदीचे पात्र मुजोर वाळूमाफियांनी ठिकठिकाणी कुरतडले असून शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मज्जाव केल्यास त्याला दमदाटी व शिवीगाळ केली जात आहे.