रस्त्यांची धूळधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:25 AM2021-07-08T04:25:44+5:302021-07-08T04:25:44+5:30
सातारा : सातारा शहरातील मुख्य रस्त्यांचे पालिकेने डांबरीकरण केले असले तरी अंतर्गत रस्त्याची मात्र धूळधाण झाली आहे. पालिकेने ठिकठिकाणचे ...
सातारा : सातारा शहरातील मुख्य रस्त्यांचे पालिकेने डांबरीकरण केले असले तरी अंतर्गत रस्त्याची मात्र धूळधाण झाली आहे. पालिकेने ठिकठिकाणचे रस्ते खड्डे केवळ खडी व डांबर टाकून मुजविले होते. डागडुजीचे काम दर्जेदार न झाल्याने दुरुस्तीसाठी वापरण्यात आलेली खडी पुन्हा उखडली असून, परिस्थिती जैसे थे झाली आहे. या खडीमुळे सर्वत्र धुरळा उडत असून, वाहनधारकांसह पादचाऱ्यांना धुळीतूनच प्रवास करावा लागत आहे.
पाण्याचा अपव्यय
सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सातारकरांची पाणीटंचाईची समस्या मिटली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील बोगदा, समर्थ मंदिर परिसर व माची पेठ परिसरातील नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय सुरू करण्यात आला आहे. गरजेपेक्षा अधिक पाण्याचा वापर होत असून, याकडे कोणाचेही नियंत्रण नाही. पाणीपुरवठा विभागाने पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दुरुस्तीची मागणी
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. घाटातील संरक्षक कठडे ढासळले असून, कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे या घाटरस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. हा धोका लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील संरक्षक कठड्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
पालिकेकडून स्वच्छता
सातारा : सातारा शहर व परिसरात झालेल्या मुुसळधार पावसामुळे ओढे, नाले कचऱ्याने तुडुंब भरले होते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह देखील पूर्णत: बंद झाला होता. सातारा पालिकेकडून ओढे स्वच्छतेचे काम तातडीने हाती घेण्यात आले. माची पेठ, केसरकर पेठ, बोगदा परिसर येथे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच रस्त्याकडेला वाढलेली झुडपे हटविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
साईडपट्ट्या खचल्या
नागठाणे : तारळे-नागठाणे दरम्यान साईडपट्ट्या खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी रस्त्याच्या साईडपट्टीवरून वाहून गेल्याने साईडपट्ट्यांचा भरावही वाहून गेला आहे. संबंधित विभागाने खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच साईडपट्ट्या भरून घ्यावात, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमधून होत आहे.
कचरा थेट रस्त्यावर
सातारा : सातारा शहरातून संकलित केला जाणार कचरा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत टाकला जातो. वाऱ्यामुळे हा कचरा रस्त्यावर येत असल्याने याचा सोनगाव, शेंद्र परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डेपोच्या बाहेर रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचत आहे. शिवाय संरक्षक भिंतीखालूनही हा कचरा रस्त्यावर येत आहे. पालिकेने डेपोच्या बाहेरही स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांमधून केली जात आहे.
वाहनधारक त्रस्त
खंडाळा : खंडाळा-लोणंद रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावरून ये-जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे खड्डे खडी व मुरूम टाकून मुजविण्यात आले. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या देखील मोठ्या प्रमाणात खचल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, या मार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
आजारांमध्ये वाढ
सातारा : वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, सर्दी, खोकला या आजारांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून साथरोग आटोक्यात आणण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी धूर व औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.
फुलझाडांना उभारी
सातारा : सातारा शहर व परिसरात सलग तीन-चार दिवस झालेल्या वळवाच्या पावसाने शाहू चौक ते रयत शिक्षण संस्था या दरम्यान असणाऱ्या दुभाजकामधील फुलझाडांना उभारी मिळाली आहे. दुभाजकामध्ये वाढलेले गवत व कचरा पालिकेच्या वतीने काढून टाकण्यात आला आहे. ही फुलझाडे पाण्याअभावी कोमेजून चालली होती. परंतु अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फुलझाडांना नवसंजीवनी मिळाली आहे.
उपनगरांमध्ये कचरा
सातारा : सातारा शहर हद्दीत पालिकेची घंटागाडी सकाळीच फिरत असते. ती अकरा वाजेपर्यंत कचरा गोळा करते; पण उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी दोन-दोन दिवस घंटागाडी फिरकत नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकण्याशिवाय पर्यायच नाही. यामुळे अनेक भागांतील रस्त्यावर कचऱ्यांचे ढीग साठलेले पाहायला मिळत आहेत. दुर्गंधीही सुटत असल्याने वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.