धावली फाट्याजवळ जुंगटीकडे जाणारा रस्ता खचला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:22 AM2021-07-24T04:22:51+5:302021-07-24T04:22:51+5:30

पेट्री : कास-बामणोली परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने कास-जुंगटी रोडवरील धावली फाट्याजवळ जुंगटीकडे जाणारा रस्ता ...

The road leading to Jungati near Dhavali fork was blocked! | धावली फाट्याजवळ जुंगटीकडे जाणारा रस्ता खचला!

धावली फाट्याजवळ जुंगटीकडे जाणारा रस्ता खचला!

Next

पेट्री : कास-बामणोली परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने कास-जुंगटी रोडवरील धावली फाट्याजवळ जुंगटीकडे जाणारा रस्ता खचल्याने जुंगटी-जळकेवाडीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सातारा तालुक्यातील कास-जुंगटी रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी धावली फाट्याजवळ याच ठिकाणी रस्ता मधोमधच दीड ते दोन फुटांनी खचला होता. त्यावेळी वाहतूक काही दिवस ठप्प झाली होती. दरम्यान, प्रशासनाकडून या ठिकाणी खचलेल्या रस्त्याची पाहणी करून पंचनामा केला होता. मात्र, कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने अखेर ग्रामस्थांनीच पाऊस उघडल्यावर दगड माचून वाहतूक सुरू केली होती. मात्र, पुन्हा दोन वर्षांनी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचला असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.

रस्त्याच्या कडेच्या भागाची दरड कोसळली असून, साधारण रस्ता दोन फुटांनी खचला आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास रस्त्याच्या खचलेल्या भागासह रस्ताच येत्या काही दिवसांत तुटून जाणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जुंगटी, जळकेवाडी, कात्रेवाडी, कारगाव, पिसाडी आदी गावांसाठी हा एकमेव मार्ग वाहतुकीसाठी असल्याने नागरिकांची वाहतूक ठप्प झाली असून, या गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

(कोट)

गेल्या दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्ता खचून वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाकडून केवळ पंचनामा झाला, मात्र उपाययोजना काहीही केल्या नाहीत. त्यावेळी जर खालच्या बाजूने संरक्षक भिंत बांधली असती तर आज अशी परिस्थिती उद्भवली नसती.

- नारायण कोकरे, ग्रामस्थ, जुंगटी ता. सातारा

(कोट)

धावली फाट्याजवळ रस्ता खचल्याने आमच्या संकटात भर पडली असून, कोणी आजारी पडल्यास दवाखान्यात न्यायचे कसे? दररोज दूध घालण्यासाठी व बाजारपेठेत जाण्यासाठी पायपीट करायची किती? खचलेल्या रस्ताच्या बाजूने तात्पुरता जेसीबी लावून उपाययोजना करून वाहतूक सुरू करावी व तत्काळ या ठिकाणासह कास-जुंगटी रस्ता दुरुस्तीसाठी घ्यावा. अनेक ठिकाणी मोऱ्यांचे पाणी रस्त्यावर येत असून रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे.

-धुळाजी शिंदे, ग्रामस्थ, जळकेवाडी

२३पेट्री

कास-जुंगटी रस्त्यावरील धावली फाट्याजवळ जुंगटीकडे जाणारा रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. ( छाया : सागर चव्हाण)

Web Title: The road leading to Jungati near Dhavali fork was blocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.