बनवडी फाट्यानजीक रस्त्याची दुरुस्ती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:54 AM2021-01-02T04:54:31+5:302021-01-02T04:54:31+5:30
कऱ्हाड : कऱ्हाड ते मसूर रस्त्याची बनवडी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खडी ...
कऱ्हाड : कऱ्हाड ते मसूर रस्त्याची बनवडी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खडी विस्कटली आहे. त्याचा त्रास वाहनधारकांसह प्रवाशांना होत आहे. तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वाहन गेल्याने वाहनांचेही नुकसान होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून अवजड वाहतुकीमुळे रस्ता आणखीनच खराब झाला आहे. तरी बांधकाम विभागाने रस्त्याची पाहणी करून त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांतून होत आहे.
रिसवड ते शहापूर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले
मसूर : रिसवड ते शहापूर या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे् पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. तरी संबंधितांनी या रस्त्याची पाहणी करून रस्ता त्वरित डांबरीकरण करावा, अशी मागणी रिसवड येथील ग्रामस्थांतून होत आहे. सह्याद्री कारखान्याला उस वाहतुकीसाठी जवळचा मार्ग म्हणून हा रस्ता ओळखला जातो. तसेच कऱ्हाड-मसूर रस्त्याला जोडणारा व अंतवडी, रिसवड व शामगाव घाटाकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरुन कोल्हापूर, पुणेकडे जाण्यासाठी हा रस्ता तयार करण्यात आला होता.
कऱ्हाड-पाटण रस्त्याचे चौपदरीकरण गतीने
कऱ्हाड : कऱ्हाड ते पाटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ठिकठिकाणी जोडरस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी दुभाजक उभारले जात आहेत. कऱ्हाडनजीकच्या वारुंजी फाट्यापासून सुपने गावापर्यंत रस्त्यावर साईडपट्ट्यांना पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. सुपने येथे काही अंतराच्या एका लेनचे काम अद्याप बाकी आहे. ते कामही येत्या काही दिवसात पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
कऱ्हाडला कॅनॉलवर वाहतूक अस्ताव्यस्त
कऱ्हाड : येथील कृष्णा कॅनॉल परिसरातून मसूर व विट्याच्या दिशेने वाहने जातात. मात्र, याठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे. तिन्ही दिशांनी येणारी वाहने एकाच ठिकाणी समोरासमोर येतात. ही वाहने मार्गस्थ होताना काहीवेळा चालकांत वादावादी घडत आहे. तसेच अपघाताची शक्यताही निर्माण होत असून, ही परिस्थिती टाळण्यासाठी येथे कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
कऱ्हाड शहरातील मुख्य बाजारपेठेत कोंडी
कऱ्हाड : येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेतील रस्ता अरुंद असल्याने दुपारी बारापर्यंत आणि सायंकाळी चारनंतर या रस्त्यावरून चारचाकी वाहनांच्या रहदारीस बंदी घालण्यात आली आहे. सध्या मात्र या मार्गावरून मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनांची रहदारी होत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. वाहतूक सुरळीत होण्यासाठी शाखेने आजपर्यंत अनेक उपाय योजले. मात्र, बाजारपेठेतील प्रश्न सोडविण्यास यश आलेले नाही.
तांबवे विभागात वीज खांबांना वेलींचा विळखा
तांबवे : परिसरात विजेच्या खांबांसह काही ठिकाणी तारांंवरही झाडवेली वाढल्या आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन एखाद्याला जीव गमवावा लागेल, अशी स्थिती आहे. विभागात अनेक ठिकाणी विजेच्या खांबांवरील प्रवाहित तारेपर्यंत हे वेल गेले आहेत. त्याचा धक्का बसून एखाद्याचा जीव जाण्याचा धोकाही त्यामुळे निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे हे वेल मोठया प्रमाणात वाढले आहेत. वीज कंपनीने विजेच्या खांबाभोवती वाढलेली झाडवेली काढून तातडीने खांब मोकळे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.