पोलिसांकडून रस्ता खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:08+5:302021-01-10T04:31:08+5:30

साताऱ्यातील पोवई नाका ते बसस्थानक मार्गावर अनेक फळविक्रेते रस्त्याच्या कडेला बसलेले असतात. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठीही जागा उरत नाही. ...

Road opened by police | पोलिसांकडून रस्ता खुला

पोलिसांकडून रस्ता खुला

Next

साताऱ्यातील पोवई नाका ते बसस्थानक मार्गावर अनेक फळविक्रेते रस्त्याच्या कडेला बसलेले असतात. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठीही जागा उरत नाही. तसेच अपघातांचा धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फळविक्रेत्यांना रस्त्यापासून आत बसविण्याच्या सूचना केल्या. (छाया : जावेद खान)

००००००००००००

गल्ली-बोळात क्रिकेट

सातारा : लॉकडाऊनमुळे शाळा बंदच आहेत. त्यामुळे मुलं मार्चपासून घरातच बसून आहेत. विरुंगुळा म्हणून काही मुलं गल्ली-बोळातून क्रिकेटचा खेळ खेळत आहेत. काही इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर खेळ रंगत आहेत. त्यातून अनोखा आनंद मिळत आहे.

००००००

अस्ताव्यस्त पार्किंग

सातारा : साताऱ्यातील अनेक वसाहतींमध्ये राहत असलेल्या मालकांपेक्षा वाहनांची संख्या जास्त असते. त्यामुळे वाहने कोठे उभी करायची, असा प्रश्न असतो. त्यातच काही वाचनचालक अस्ताव्यस्त गाड्या उभ्या करतात. त्यामुळे इतरांना गाड्या उभ्या करण्यास जागा मिळत नाही. त्यातून वादावादीचे प्रसंग उद‌्भवत आहेत. काळजी घेण्याची गरज आहे.

००००००

वणव्याने हिरावला चारा

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावरील डोंगरात मोठ्या प्रमाणावर चारा तयार झाला होता. मात्र अज्ञात व्यक्तींनी वणवा लावल्याने तो जळून खाक झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याची दखल घेऊन प्रशासनाने वणवे लावणाऱ्यांविरोधात मोहीम तीव्र करण्याची गरज आहे.

०००००

खांब दिशादर्शक

सातारा : साताऱ्यातील जुना आरटीओ चौकात असलेला विद्युत खांब वाहतुकीसाठी दिशादर्शक ठरत आहे. या ठिकाणी पाच रस्ते जोडले जात आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. चौकाच्या मधोमध हा खांब असल्याने तो वाहनचालकांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

००००००

कापडही गायब

सातारा : साताऱ्यातील खालचा रस्ता परिसरातील वाहनचालक गाडी स्वच्छ करण्यासाठी कापडे ठेवत असतात. मात्र साताऱ्यातील काही मंडळी यावरही डल्ला मारत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी सीसीटीव्ही असतानाही ते धाडस करत आहेत.

०००००००००

कोरोनाबाधितांत वाढ होत असल्याने धोका

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या महिना-दीड महिन्यापासून नियंत्रणात आली होती. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून हळूहळू कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. शनिवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत फलटण तालुक्यात वीस रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

००००००

ढगाळ वातावरण

दहीवडी : माण तालुक्यातील दहीवडीसह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे हरभरा, मका, कांदा, वाटाणा यावर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.

०००००

महामार्गावर कचरा

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीत ठिकठिकाणी कचरा साठून पडलेला असतो. हा कचरा संबंधित विभागाने तो तातडीने उचलून त्याची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे असंतोष व्यक्त केला जात आहे.

०००००

काचेच्या ग्लासला नकार

सातारा : साताऱ्यातील हॉटेल कोरोना काळात बंद होती. ती पुन्हा सुरू झाली आहेत. ग्राहकही वाढत आहेत. मात्र कोरोनाबाबत धास्ती अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे एखाद्या हॉटेलमध्ये काचेच्या ग्लासमधून चहा मिळत असल्यास ग्राहक तो घेण्यास नकार देऊन कागदी ग्लासमधून देण्याची मागणी करत आहे.

००००००

विजेचा लपंडाव

दहीवडी : माण तलुक्यातील अनेक भागात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनेकदा रात्रभर वीज गायब होत असल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिके वाळून चालली असताना विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही.

०००००

रेवड्याची प्रतीक्षा

सातारा : संक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देण्याची पद्धत आहे; पण अलीकडच्या काही वर्षांपासून तिळगूळ देण्याचे प्रमाण कमी झाले असून, रेवड्या दिल्या जात आहेत. त्यामध्येही विविध प्रकारच्या रेवड्यांना मागणी असते. मात्र रेवड्या बाजारात आल्या नसल्याने नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे.

००००००००

बिनविरोध चौदा गावांचा होणार गौरव

दहीवडी : सलग ५३ वर्षे बिनविरोध ग्रामपंचायतीची असलेली परंपरा बिदालला लाभली आहे. या गावाने तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार तालुक्यातील चौदा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. याबद्दल बिदाल ग्रामपंचायत या बिनविरोध ग्रामपंचायतींचा गौरव करणार आहे. यामुळे तालुक्यात एक चांगला पायंडा पडणार आहे.

००००००००००

०६जावेद१२

टपालाबरोबरच कार्यालयेही दुर्लक्षित

मोबाईल क्रांती झाली अन् टपाल सेवा मागे पडू लागली. मात्र अनेक शासकीय सेवेसाठी पोस्टाचाच आधार घ्यावा लागतो. मात्र टपालाबरोबरच आता टपाल कार्यालयेही दुर्लक्षित होत आहे. समर्थ मंदिर परिसरातील उपकार्यालयाची दुरवस्था झाली आहे. (छाया : जावेद खान)

Web Title: Road opened by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.