सासकल गावचा रस्ता ७४ वर्षांपासून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:25 AM2021-06-10T04:25:50+5:302021-06-10T04:25:50+5:30

फलटणसासकल (ता. फलटण) गावच्या रस्त्याचा प्रश्न हा कायमच ऐरणीवर राहिला आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करणे किंवा कायमस्वरूपी डांबरीकरण ...

The road to Saskal village has been pending for 74 years | सासकल गावचा रस्ता ७४ वर्षांपासून प्रलंबित

सासकल गावचा रस्ता ७४ वर्षांपासून प्रलंबित

Next

फलटणसासकल (ता. फलटण) गावच्या रस्त्याचा प्रश्न हा कायमच ऐरणीवर राहिला आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करणे किंवा कायमस्वरूपी डांबरीकरण करणे ही कित्येक वर्षांची ग्रामस्थांची मागणी गेल्या ७४ वर्षांत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

फलटण तालुक्यात अनेक निवडणुका झाल्या. मग त्या ग्रामपंचायतींच्या असतील किंवा जिल्हा परिषदेच्या. विधानसभेच्या अन् लोकसभेच्याही. लोकप्रतिनिधी उमेदवार म्हणून गावात येतात आश्वासनांची खैरात करतात. या सर्वांसमोर कायम सासकल ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केलेली असताना निवडून आल्यानंतर मात्र या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले जाते. अनेक गावांमध्ये एकेक रस्ता अनेक वेळा डांबरीकरण झाला आहे. नेमकं सासकलच्याच रस्त्याच्या वेळी माशी कुठे शिंकते, हाच प्रश्न पडतो.

फलटण दहिवडी या मुख्य रस्त्यापासून सासकल गावठाणास जाणारा रस्ता भाडळी बुद्रुक हद्दीतील गट नंबर १९५, १९२, १९० मध्ये अडविण्यात आला होता. अडविलेला रस्ता महसूल कोर्टामध्ये वर्षभर केस लढून सासकल ग्रामस्थांसाठी खुला करण्यात आला. तरीसुद्धा प्रशासनाने यासंदर्भात योग्य ती कारवाई का केली नाही. याही घटनेला आता जवळजवळ १२ वर्षे उलटली आहेत. ही केस ॲड. रामचंद्र घोरपडे यांनी विनामोबदला लढून सासकल गावासाठी सदर रस्ता खुला करून घेतला. याकामी माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पाठपुरावा केला हाेता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा रस्ता खुला करण्यासाठी आंदाेलन करण्यात आले होते.

रस्ता ग्रामस्थांसाठी खुला झाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले होते. हा रस्ता बनवत असतानाच या रस्त्याच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान न करता हा रस्ता लवकरात लवकर करण्याचे नियोजन होते. तरीही सासकल गावचा रस्ता हा अजूनही रामभरोसेच राहिला आहे.

चौकट

रस्त्यावरील पूलही गेले पाहून

सासकल गावात येण्यासाठी ओढ्यावरूनच यावे लागते. याच ओढ्यावर वेगवेगळ्या निधीतून तीन पूल बांधण्यात आले आहेत. यापैकी दोन पूल हे गेल्या दोन वर्षांपूर्वीच वाहून गेले. त्यावर कोणत्याही प्रकारची पुढील कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामधील एक पूल हा सासकल येथील हरिजन वस्तीस जोडणारा होता. या पुलासाठी २६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. ढिसाळ व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसात हा साकव पूल वाहून गेला. हा पूल बांधताना मागासवर्गीय निधीचा गैरवापर झाल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली होती. याच ओढ्यावर या साकव पुलापूर्वी बांधण्यात आलेला सासकल गावठाण ते गिरवी रोड या रस्त्यावरील साकव पूल गेल्या वर्षी आलेल्या पावसात वाहून गेला.

Web Title: The road to Saskal village has been pending for 74 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.