रस्त्यांची ‘सेवा’ सुरू! महामार्ग दुरुस्ती
By admin | Published: November 19, 2014 10:00 PM2014-11-19T22:00:27+5:302014-11-20T00:00:40+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर कामांना सुरुवात
सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावरील त्रुटी दूर करण्याबाबत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार महामार्गाच्या सेवारस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, अद्यापही एसटी बसेस असुरक्षितरीत्या रस्त्याच्या कडेला उभ्या राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट ते शेंद्रे परिसराची पाहणी केली असता महामार्गावर अनेक त्रुटी असल्याचे अजूनही स्पष्टपणे दिसत आहे. सेवा रस्त्यांची कामेही पूर्ण झालेली नाहीत. शिवराज चौकामध्ये जीव मुठीत घेऊन महामार्ग क्रॉसींग सुरु आहे. कऱ्हाडकडे जाणाऱ्या मार्गापेक्षा सेवा रस्ता खड्ड्यात असल्याने रात्रीच्यावेळी वाहने पलटी होण्याचे प्रकार सुरु आहेत. मुख्य रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहेत. त्याची दुरुस्ती सुरु करण्यात आलेली नाही. महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदाराने सहापदरीकरणाची कामेच सुरु ठेवली आहेत; परंतु रिफ्लेक्टर लावण्याचे काम पाहायला मिळत नाही. या कामात अनेक त्रुटी असून त्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी) अजूनही शहाणपण येईना शेंद्रे चौकात सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. याठिकाणी शेंद्रेतून महामार्ग ओलांडण्यासाठी आलेली वाहने दोन लेनच्या मध्यभागी असुरक्षितपणे उभ्या असलेल्या पाहायला मिळतात. बोगद्याकडून आलेली वाहने तीव्र चढण पूर्ण करुन महामार्गावर येतात. मात्र महामार्गावरील वाहनांचा वेग जास्त असतो. याच ठिकाणी प्रवाशीही एसटी अथवा वडाप वाहनाची वाट पाहत उभे राहत असल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवराज चौक आणि शेंद्रे चौक मृत्यूचा सापळा ठरत आहे.