रस्ता चोरीला गेल्याची तक्रार, कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांचा जनावरांसह सातारा 'झेडपी'समोर ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 06:32 PM2022-12-08T18:32:17+5:302022-12-08T18:32:40+5:30
दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार
सातारा : सातारा तालुक्यातील रोहोट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या जांभळेघरवस्ती ते घाटाई दरम्यानचा रस्ता चोरीला गेला अशी तक्रार करूनही पुढे कार्यवाही न झाल्याने शिवसेनेने (ठाकरे गट), ग्रामस्थ आणि जनावरांसह जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मारला. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांबरोबर चर्चा करून चौकशीनंतर कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान, ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर गाय, म्हशी आणि मेंढ्या बांधल्या होत्या.
याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सचिन मोहिते म्हणाले, ‘ रोहोट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या जांभळेघरवस्ती ते घाटाई दरम्यानचा अडीच किलोमीटर रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण न करताच ठेकेदाराने परस्पर ११ लाख रुपयांचे बिल काढले आहे. यामध्ये रस्ता चोरीला गेला असून या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी. यासाठी १५ दिवसांपूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.
मात्र, कार्यवाही न झाल्याने हे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे मोहिते यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र, यापुढे दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.