ठिकठिकाणी रस्ता तुटला... दरडीही कोसळू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:12+5:302021-07-12T04:24:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ढेबेवाडी : ढेबेवाडी - पाटण मार्गावरील सुमारे बारा किलोमीटर अंतराच्या घाटात अनेक ठिकाणी रस्त्यासह फरशीपुलांचे कठडे ...

The road was broken in some places ... even the patients started collapsing | ठिकठिकाणी रस्ता तुटला... दरडीही कोसळू लागल्या

ठिकठिकाणी रस्ता तुटला... दरडीही कोसळू लागल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ढेबेवाडी : ढेबेवाडी - पाटण मार्गावरील सुमारे बारा किलोमीटर अंतराच्या घाटात अनेक ठिकाणी रस्त्यासह फरशीपुलांचे कठडे तुटल्याने हा रस्ता वाहतुकीला धोकादायक बनला आहे. या घाटातील रस्त्याची दुरुस्ती आणि फरशीपुलांची कामे अनेक दिवसांपासून रखडल्याने बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघतोय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेहमीच वर्दळीचा असलेल्या ढेबेवाडी - पाटण या तीस किलोमीटरच्या मार्गावर बारा किलोमीटरचा नागमोडी घाटरस्ता आहे. पावसाळ्यात याठिकाणी वारंवार दरडी कोसळतात. आत्ताही घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याबरोबरच रस्ताही तुटला आहे. बांधकाम विभागाकडून नेहमीच या रस्त्याची केवळ मलमपट्टी केली जाते. पावसाळा आला की येथून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.

साधारण बारा ते तेरा किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर अनेक धोकादायक वळणे आहेत. रस्ताही काही ठिकाणी अरूंद आहे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात या रस्त्याच्या रूंदीकरण, मजबुतीकरणासाठी त्यांनी २०१३-१४मध्ये ७ कोटी ९५ लाख रुपये मंजूर केले होते. प्रशासकीय सोपस्कार करून ते काम सुरू झाले. त्याला पाच ते सहा वर्षे झाली पण रूंदीकरण व मजबुतीकरणाचे काम दर्जेदार झालेच नाही, अशा तक्रारी वारंवार झाल्या व आजही तशा तक्रारी होत आहेत.

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी याच रस्त्याच्या काही भागाच्या मजबुतीकरण व रूंदीकरणासाठी सत्तर लाख रूपये मंजूर केले आहेत. ते काम आजही सुरू आहे पण अपूर्णच आहे. कामाच्या दर्जाबाबत असलेल्या तक्रारी आजही कायम आहेत. या घाटरस्त्यावर अधूनमधून दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. तशा आजही घडल्या आहेत मात्र सुदैवाने दगड, माती रस्त्यावर आलेली नाही मात्र तो धोका कायम आहे.

या रस्त्यावर अनेक मोऱ्या आहेत. काही फार जुन्या आहेत, त्यांच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. अशाच एका उतारावर फरशीपुलाची दरीच्या बाजूकडील दरड ढासळली आहे. अद्याप पावसाळा पूर्ण क्षमतेने सुरू नाही पण अतिवृष्टीत हा भराव वाहून गेल्यास रहदारी बंद पडण्याचा धोका आहे. याचपद्धतीने दोन ठिकाणी रस्ता खचल्याचे आणि नवीन फरशीपूल अर्धवट असल्याने वाहून जाण्याचा धोका आहे.

या रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून कामे सुरू आहेत.

- राजाराम खंडागळे

शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटण.

फोटो १० ढेबेवाडी

ढेबेवाडी - पाटण मार्गावरील फरशी पुलावरील कठडे तुटले आहेत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. (छाया : रवींद्र माने)

Web Title: The road was broken in some places ... even the patients started collapsing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.