तीनदा खोदला रस्ता तरी निघेना गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:43 AM2021-09-22T04:43:43+5:302021-09-22T04:43:43+5:30
सातारा : जीवन प्राधिकरणकडून एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीन वेळा सदर बझार येथील भारतमाता चौकात खोदकाम करण्यात आले. ...
सातारा : जीवन प्राधिकरणकडून एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीन वेळा सदर बझार येथील भारतमाता चौकात खोदकाम करण्यात आले. मात्र, मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती काही निघाली नाही. सततच्या गळतीमुळे या भागाला कधी दूषित तर कधी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, जीवन प्राधिकरणच्या कामकाजाबाबत नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सदर बझार परिसराला जीवन प्राधिकरणकडून कृष्णा उद्भव योजनेद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जाते. येथील भारतमाता चौकातील बंदिस्त मुख्य जलवाहिनीला सातत्याने गळती लागत आहे. दोन महिन्यांत दोन वेळा गळती काढण्याचे काम करण्यात आले. मात्र, मंगळवारी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी गळती लागली. याबाबतची माहिती मिळताच जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम हाती घेऊन गळतीचे काम मार्गी लावले.
दरम्यान, एकाच ठिकाणी सतत गळती लागत असल्याने या भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. शिवाय या जलवाहिनीत नाल्यातील सांडपाणी मिसळत असल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. खोदकामामुळे रस्त्याची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जीवन प्राधिकरणने ही गळती कायमस्वरुपी काढावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
(कोट)
मुख्य जलवाहिनीला सातत्याने गळती लागत आहे. त्यामुळे आम्हाला कधी दूषित तर कधी कमी दाबाने पाणी मिळत आहे. खोदकामामुळे रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी न लावल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.
- महेश देशमुख, सदर बझार
फोटो : २१ सदर बझार
सदर बझार येथील भारतमाता चौकात मंगळवारी दुपारी जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांकडून जलवाहिनीला लागलेली गळती काढण्यात आली. (छाया : जावेद खान)