रस्त्याचे रुंदीकरण झाडांच्या मुळावर!
By admin | Published: July 9, 2015 10:53 PM2015-07-09T22:53:39+5:302015-07-09T22:53:39+5:30
वनविभाग-प्रशासनाची डोळेझाक : वाईच्या पश्चिम भागात बेसुमार वृक्षतोड
पांडुरंग भिलारे - वाई -वाईच्या पश्चिम भागात मुगावजवळ अंतर्गत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे़ या रुंदीकरणात बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली आहे़ ही वृक्षतोड करीत असताना कोणत्याही विभागाची परवानगी घेतली गेलेली नाही़ , यामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे़ शासन वृक्ष लागवडीसाठी लाखो रूपये खर्च करीत असताना रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झाडांच्या मुळावरच घाव घातला जात असून प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी, या मागणीचे स्थानिक ग्रामस्थांनी प्रातांना निवेदन दिले आहे़
निवेदनात म्हटले आहे की, या रस्ता रुंदीकरणात आंबा, फणस, नारळ यासारखी फळझाडे जमीन दोस्त करण्यात आली आहेत़ या व्यतिरिक्त शाळेचे पटांगण, पाण्याची टाकी, मंदिर, गोबर गॅस, वैयक्तिक शौचालय संरक्षक भिंत तोडण्याच्या मार्गावर असून यामुळे स्थानिक नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे़
प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे़ या निवेदनावर परिसरातील लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत़
लहान वस्तीसाठी ३५ फुटी रस्ता?
रस्ता रुंदीकरण वैयक्तिक स्वार्थापोटी करण्यात येत आहे़ वास्तविक हा दळणवळणाचा मुख्य रस्ता नसून दहा ते वीस घरांची वस्ती असलेला परिसर आहे़ त्यामुळे एवढ्या छोट्या वस्तीसाठी पस्तीस फुटी रस्त्याची काय आवश्यकता, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे़.
परवानगी न घेता वृक्षतोड
या रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या आठ दिवसांपासून चालू असून याबाबत संबंधित विभागाकडे चौकशी केली असता कोणत्याही प्रकाची परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात आले़ संबंधित विभागाने या बेसुमार वृक्षतोडीची त्वरित पाहणी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे़