४५ वर्षे रखडले रस्त्याचे काम
By admin | Published: July 25, 2016 10:30 PM2016-07-25T22:30:27+5:302016-07-25T23:43:10+5:30
ग्रामस्थांचे होतायत हाल : वाई-कोरेगावला जोडणाऱ्या रस्त्यातील अडथळा हटता हटेना
भुर्इंज : रस्ते विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणून संबोधल्या जातात. वेळेची बचत होण्यासोबतच जनतेची सोय व्हावी म्हणून अनेक जवळचे मार्ग निर्माण करण्यावर भर दिला जातो. वाई आणि कोरेगाव तालुक्याला जोडणाऱ्या अशाच एका जवळच्या मार्गाचे काम ही सुरू झाले होते. मात्र, थोडेफार अपूर्ण राहिलेले हे काम थोडेथोडके नव्हे तर तब्बल ४५ वर्षे रखडले आहे.
१९७२ मध्ये पडलेल्या भयाण दुष्काळात शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामाला गती दिली. त्या योजनेतूनच वाई तालुक्याच्या पूर्व भागातून लगडवाडी येथून कोरेगाव तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. दोन्ही
बाजूने हे काम मोठ्या प्रमाणावर पूर्णत्वासही गेले. मात्र, लगडवाडी येथील डोंगरातील घाटातील
काही काम रखडले आणि दोन्ही तालुक्यांना जवळच्या मार्गाने जोडणारा हा रस्ता रखडला तो रखडलाच!
तब्बल ४५ वर्षे रखडलेल्या या कामाकडे पुन्हा कधीच कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही, हे विशेष. १९७२ मध्ये पडलेल्या भयानक दुष्काळात रोजगार हमी योजनेवर काम केल्यानंतर जनतेला धान्य मिळायचे. त्यामुळे ठिकठिकाणी अशा योजनेतून अनेक कामांना गती देण्यात आली. त्यातूनच वाई तालुक्याच्या पूर्व भागाला आणि कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम सुरू झाले.
स्थानिक ग्रामस्थांनी अहोरात्र राबून रस्ता तयार केला. अगदी चंदन वंदनच्या डोंगरातील या मार्गाच्या घाट रस्त्याचेही काम मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र, दुष्काळाचे सावट हटले आणि पुढे हे कामच थांबले.
या मार्गामुळे भुर्इंजहून किकली, लगडवाडीमार्गे या घाटरस्त्याने थेट बनवडी व तेथून पुढे कोरेगावला कमी वेळात व कमी अंतर पार करून जाणे शक्य आहे. बनवडीपर्यंतचा रस्ता ठिक आहे आणि डोंगराच्या या बाजूला लागवडीपर्यंतही हा रस्ता ठिक आहे.
डोंगरातील घाटरस्त्याची नव्याने डागडुजी केल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी सोयीचा आणि वेळ व इंधन वाचविणारा ठरणार आहे. कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातून व वाई तालुक्यातील पूर्व भागातून या मार्गाने रहदारी वाढू शकणार आहे.
त्यामुळे इच्छाशक्तीचा थोडा रेटा लावला तर वाई आणि कोरेगाव तालुक्यासाठी सुलभ ठरणारा एक नवा मार्ग अस्तित्वात येईल व नवी विकासवाट निर्माण होईल. त्यामुळे ४५ वर्षे अडलेल्या या विकासवाटेतील अडथळे दूर करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
त्यामुळे परिसरात राहणारे आणि कायमस्वरूपी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची उत्कृष्ट सोय होणार आहे. या रस्त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर तालुक्याच्या नेत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)