येवती ते पाटीलवाडीचा रस्ता बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:36 AM2021-04-19T04:36:18+5:302021-04-19T04:36:18+5:30
कऱ्हाड : येवती ते पाटीलवाडी या तीन कि.मी. अंतरावरील मार्गावर सध्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे या ...
कऱ्हाड : येवती ते पाटीलवाडी या तीन कि.मी. अंतरावरील मार्गावर सध्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना रात्रीच्यावेळी प्रवास करीत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने ही झाडेझुडपे तोडावीत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. यापूर्वी काहीवेळा या झाडा-झुडुपांमुळे अपघात घडले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
तळमावलेत बसथांबा परिसरात वाहतूक कोंडी
तळमावले : तळमावले येथील एसटी बसथांबा परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, ती सुरळीत करण्याची मागणी होत आहे. ढेबेवाडी हे विभागातील महत्त्वाचे ठिकाण असून, या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. तसेच नाईकबा देवस्थानासह वाल्मीक पठाराकडे जाणारे पर्यटक व भाविकही याच मार्गाने जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची आणि पादचाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे परिसर नेहमीच गजबजलेला असतो. तळमावले ही विभागातील गावांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. अनेक गावांतील हजारो ग्रामस्थ दररोज याठिकाणी येतात. मात्र, बसथांबा परिसरात वाहतूक कोंडी झाल्यास सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागतो.
खळेसह परिसरात वानरांचा धुमाकूळ
तळमावले : परिसरात वानरांनी धुमाकूळ घातला असून, पिकांसह काही घरांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने वानरांना पकडून सुरक्षितस्थळी सोडावे, अशी मागणी होत आहे. खळे गावामध्ये वानरांचा धुमाकूळ सुरू असल्याने घरांवरील पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच वानरांकडून दररोज पिकांची नासधूस सुरू आहे. शेतामधील भाजीपाला, कडधान्य ज्वारी, तसेच इतर पिके वानरांच्या तावडीतून सुटली तरच ती शेतकऱ्याच्या हाताला लागत आहेत. अनेकवेळा शेतामधील ज्वारीची कणसे गायब होत आहेत आणि फक्त ज्वारीची धाटे राहत असून, ती कणसे वानर फस्त करीत आहेत.
मोरणा विभागात बिबट्याची दहशत
पाटण : तालुक्यातील मोरणा विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, त्याच्या डरकाळीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाणे बंद केल्यामुळे शेती, दुग्धव्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडले आहेत़ शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गायी-म्हशी, शेळीपालन करून दुग्ध व्यवसायासारखे शेतीपूरक उद्योग शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या विभागात बिबट्याच्या वावरामुळे शेती आणि पूरक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.