कऱ्हाडात रस्ते पुन्हा होताहेत ‘लॉक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:32+5:302021-07-05T04:24:32+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने सोमवारपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश केला आहे. कोरोना ...
जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने सोमवारपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश केला आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला असला तरी या आदेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यातच पोलिसांनी शहरातील रस्ते अडविण्यास रविवारपासूनच सुरुवात केल्यामुळे संतापात आणखी भर पडली आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावाने तिसऱ्या स्तरात असणारा जिल्हा पुन्हा चौथ्या स्तरात गेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुन्हा जिल्ह्यात काही निर्बंध आदेशाद्वारे पारित केले आहेत. सोमवारपासून किराणा, बेकरी यासह इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवांना मुभा असतानाही पोलिसांनी रस्त्यावर बॅरिगेटस् लावण्याचे कारण काय, असा प्रश्न सामान्यांसह व्यापाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वीच रस्त्यावरील बॅरिगेटस् हटविण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र, पुन्हा रस्ते बंद करण्याची पोलिसांची जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होणार असून नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
- चौकट
१) कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोल पंप
२) पोपटभाई पेट्रोल पंप ते शाहू चौक
३) भेदा चौक ते प्रशासकीय इमारत
४) शाहू चौक ते दत्त चौक
५) दत्त चौक ते मुख्य बाजारपेठ
६) आझाद चौक ते चावडी चौक
७) विजय दिवस चौक ते स्टेशन रोड
८) कर्मवीर पुतळा ते विजय दिवस चौक
- चौकट
रहदारीसाठी ठेवली जागा
कऱ्हाडातील मुख्य रस्त्यांवर बॅरिगेटस् उभारून पोलिसांनी लॉकडाऊनची पूर्वतयारी केली आहे. पोपटभाई पंपासमोरून शहरात येणारा मार्ग वगळता अन्य ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिगेटसमधून वाहनांना जाण्याएवढी जागा मोकळी ठेवण्यात आली आहे. ही जागाही आणखी किती दिवस मोकळी राहणार, हा प्रश्न आहे. कारण पोलिसांची ही तयारी ‘लॉकडाऊन’साठीच असल्याचे दिसून येत आहे.
फोटो : ०४केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाडात लॉकडाऊनची पूर्वतयारी म्हणून पोलिसांनी मुख्य रस्त्यांवर रविवारी बॅरिगेटस् लावले.