रस्ते सामसूम : लोक घरात अडकल्याने रानगवे, बिबट्या प्राणींचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 07:30 PM2020-04-22T19:30:43+5:302020-04-22T19:34:43+5:30
अनेक लोकांनी स्वत:ला आपापल्या घरात क्वॉरंटाईन केले आहे. या लॉकडाऊनचा वन्य पशुपक्ष्यांच्या जीवनावर चांगला परिणाम होऊन कास, बामणोली परिसरातील वन्य पशुपक्ष्यांचा मुक्तपणे संचार होतानाचे चित्र आहे.
पेट्री : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. लोकांना घराच्याबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. लोक घरामध्ये अडकल्याने रस्ते आणि इतर सार्वजनिक ठिकाणे सामसूम आहेत. त्यामुळे वन्यजीवांचा रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी मुक्त संचार वाढला आहे. सातारा-कास रस्त्यावर सध्या रानगवे, बिबट्या, साळिंदर, अस्वल, ससे, भेकर, सांबर आदी वन्यजीव मुक्त संचार करू लागले आहेत.
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. शासनाने जमावबंदी व संचारबंदीचे आदेश काढल्याने लोकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीशिवाय बाहेर पडता येत नाही. त्यासाठीही ठराविक वेळ निश्चित करण्यात आली आहे. अनेक लोकांनी स्वत:ला आपापल्या घरात क्वॉरंटाईन केले आहे. या लॉकडाऊनचा वन्य पशुपक्ष्यांच्या जीवनावर चांगला परिणाम होऊन कास, बामणोली परिसरातील वन्य पशुपक्ष्यांचा मुक्तपणे संचार होतानाचे चित्र आहे.
सातारा-कास रस्त्यावरील माणसांची वर्दळ कमी झाली असून, गाड्यांचा कर्णकर्कश हॉर्न यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी झाले आहे. वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाल्याने सातारा-कास मार्गावर पूर्वीपेक्षा अधिक मुक्तपणे वन्यजीवांचा संचार वाढू लागला आहे. त्यांना मोकळेपणाने आपले जीवन जगता येऊ लागले आहे. त्यामुळे भेकर, रानडुक्कर, रानगवे, ससे, रानकोंबड्या, साळिदंर, मोर, घोरपड यासारखे वन्यजीव निर्भीडपणे रस्त्याच्या आसपास, रस्त्याच्या बाजूला सहज संचार करू लागले आहेत.