साप्ताहिक सुटीत भरले रस्त्यावरील खड्डे
By admin | Published: September 3, 2016 12:31 AM2016-09-03T00:31:18+5:302016-09-03T01:00:50+5:30
कामगाराचा आदर्श : बांधकाम विभागाच्या डोळ्यात भरले अंजन - गुड न्यूज
सातारा : पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे रस्त्याबाबत शासन करत असलेले सर्वच उपाय पाण्यात गेले आहेत. सातारा येथील एका खासगी कंपनीत कामाला असणाऱ्या मनोज खत्री यांनी मात्र आता बांधकाम विभागाच्या डोळ्यात चक्क अंजन घालत स्वत:च रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे.
सातारा एमआयडीसीमधील कारंडवाडी गावातील मनोज खत्री हे साताऱ्यातील खासगी कंपनीत कामगार आहेत. कामासाठी दररोज ते सकाळी व सायंकाळी ते आपल्या दुचाकीवरून या रस्त्याने ये-जा करत आहेत. खत्री यांनी स्वत:च्या घरातूनच पाटी घमेली आणून या रस्त्यावरील मोठे खड्डे मुजवण्याचा निर्धार घेऊन या कामगाराने आपल्याला आठवड्यातून मिळालेली एकमेव सुटी या रस्त्यावरील खड्डे भरण्यात
घालविली.
सकाळी ९ वाजता या कामगाराने या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी सुरुवात करून सायंकाळी ६ वाजता या रस्त्यावरील असणारे सर्वच मोठ-मोठे खड्डे माती मुरुम टाकून भरून घेतले. हे काम चालू असताना रस्त्यावरून अनेकजण या कामगाराकडे आश्चर्याने बघत होते; मात्र याच्या मदतीसाठी कोणाचाही हात पुढे सरसावला नाही हे दुर्दैवच.
मात्र रस्त्यावरील प्रवासात या रस्त्यावर भरलेले हे खड्डे मात्र मला दररोज आठवण करून देतील हे समाधान आनंददायी असेल अशीच काय ती भावना या कामगाराने व्यक्त करत समाजसेवेचा हा वेगळा आदर्श सर्वापुढे निर्माण केला आहे. (वार्ताहर)
कामावरून दररोज ये-जा करताना खड्ड्यात आपटून अनेक अपघात मी पाहिले आहेत. खड्डे भरणाऱ्यांना या खड्ड्याकडे बघायला वेळ नाही, यापेक्षा आपल्या आठवड्याच्या सुटीत हे खड्डे स्वत: भरायचे, असा मी निर्णय घेतला आणि सुटीदिवशी सकाळीच कामाला लागलो दिवसभरात दोन-तीन मोठ्या चऱ्या आणि काही मोठे खड्डे भरल्याने मला निश्चितच एक वेगळं काम केल्याच आनंद मिळाला
- मनोज खत्री, कामगार