सेवा रस्त्यालगतच्या रस्त्यांचा सहापदरीकरणात समावेश करावा : शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:17+5:302021-09-27T04:42:17+5:30
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची पत्राद्वारे गडकरींकडे मागणी मलकापूर : ‘शहरातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत मंजूर डिपीमध्ये ४.५ मीटर ...
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची पत्राद्वारे गडकरींकडे मागणी
मलकापूर : ‘शहरातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत मंजूर डिपीमध्ये ४.५ मीटर जागा आरक्षित आहे. त्या जागेमध्ये रस्ता, पादचारी मार्ग, आरसीसी गटर व रेलिंगचे काम व मोबदला महामार्गाच्या सहापदरीकरणात मंजूर करावे,’ अशी मागणी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रान्वये या महामार्गापैकी मलकापूर शहरातून गेलेल्या ३.७५ किलोमीटर लांबीच्या महामार्गावर उड्डाण पुलाचा समावेश आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुटसुटीत होणार आहे. मलकापूर शहर महामार्गाच्या दुतर्फा वसलेले आहे. या शहराची लोकसंख्या आजमितीस ४५ हजारांपेक्षा जास्त आहे. हे शहर व्यापारी दृष्ट्या केंद्रबिंदू बनले आहे. पालिकेने चोवीस तास नळ पाणीपुरवठा योजना, सांडपाणी प्रक्रिया योजनांसह विविध लोककल्याणकारी योजना यशस्वीरीत्या राबविल्या असल्याने या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी संख्या वाढत आहे. शहरामधून गेलेल्या महामार्गाचे रुंदीकरण होत असून, नव्याने संगम हॉटेल ते एनपी मोटर्सपर्यंत उड्डाणपुलाचे काम होणार आहे. पालिकेने सध्या अस्तित्त्वात असणाऱ्या सेवा रस्त्यालगत शहर विकास योजनेमध्ये ४.५ मी. रुंदीचा रस्ता प्रस्तावित केलेला आहे. प्रस्तावित महामार्ग रुंदीकरणामध्ये त्या जागेचा समावेश करून यामध्ये रस्ता, आरसीसी गटर, पादचारी मार्ग व रेलिंग करावे.