फलटणमधील रस्ते दर्जेदार होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:04 AM2021-06-12T04:04:37+5:302021-06-12T04:04:37+5:30
फलटण : ‘फलटण शहरातील ज्या भागातील भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, त्या भागातील रस्त्यांची कामे सुरु करण्यात ...
फलटण : ‘फलटण शहरातील ज्या भागातील भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, त्या भागातील रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली आहेत. शहरातील सर्व रस्ते लवकरच दर्जेदार होतील,’ अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
फलटण शहरातील पिरॅमिड चौक ते पद्मावती नगर या रस्त्याचे भूमिपूजन संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड, ज्येष्ठ नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, पाणी पुरवठा सभापती मधुबाला भोसले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संजीवराजे म्हणाले, महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात शहरात पाणी पुरवठा योजना पाचवा टप्पा, भूमिगत वीज वाहिन्या, जलतरण तलाव, नगर परिषद प्रशासकीय कार्यालय इमारत, विविध भागात व्यापार संकुले, रिंग रोड, आदी कोट्यवधींची कामे झाली. तसेच सुमारे १०० कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिथे भुयारी गटारचे काम पूर्ण होईूल, त्या भागातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात येत असून, आगामी काळात शहरातील सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार होतील.
फलटण शहरामध्ये विविध विकासकामे सुरु असून, आगामी काही वर्षांत फलटण शहर एक मॉडेल सिटी होईल, असा विश्वास यावेळी पाणी पुरवठा सभापती अॅड. मधुबाला भोसले यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेवक अजय माळवे, किशोरसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेविका प्रगती कापसे, वैशाली चोरमले, सुवर्णा खानविलकर, ज्योत्स्ना शिरतोडे, तेजसिंह भोसले, रणजितसिंह भोसले, राहुल निंबाळकर, तुषार नाईक-निंबाळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो : ११ फलटण
फलटण येथे संजीवराजे नाईक-निंबाळकर, मधुबाला भोसले, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, संजय गायकवाड, अजय माळवे, रणजितसिंह भोसले यांच्या उपस्थितीत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. (छाया : नसीर शिकलगार)