रस्त्याकडेचे तिळगूळ ठरू शकतात अपायकारक : अनोंदणीकृत उत्पादक अन् विक्रेत्यांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:13 AM2020-01-14T00:13:15+5:302020-01-14T00:15:12+5:30
पोटदुखी आणि जुलाब याचा त्रास संभवतो. साताऱ्यात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने या पदार्थांवर धूळही बसते. या उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्याचा धोका संभवतो.
प्रगती जाधव-पाटील।
सातारा : मकर संक्रांत सणाच्या तोंडावर सध्या बाजारपेठेत फिरत्या विक्रेत्यांकडून तिळगूळ, तिळाचे लाडू आणि वडी यांची खुलेपणाने विक्री होत आहे. हे पदार्थ बनविताना वापरल्या गेलेल्या पदार्थांची गुणवत्ता न तपासताच ते विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्याने त्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
संक्रांत सणाच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अनेक विक्रेते तिळगूळ आणि तिळाची वडी व लाडू घेऊन विक्रीसाठी बसले आहेत. गाडी लावून दुकानांमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा गाडीवरून रस्त्यावरील विक्रेत्यांकडे पदार्थ घेण्याची सवय सातारकरांमध्ये रुजू लागली आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करून सुरू असलेली ही खरेदी भविष्यात आरोग्याबाबत मोठे संकट उभं करू पाहत आहे.
- सॅक्रीनचा वापर!
फिरत्या विक्रेत्यांकडे असलेल्या तिळगुळामध्ये साखरेऐवजी सॅक्रीनचा वापर केला जातो. सॅक्रीनचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असते. त्याबरोबरच यात वापरण्यात येणारे रंग हलक्या प्रतीचे असल्याने त्यामुळे पोटदुखी आणि जुलाब याचा त्रास संभवतो. साताऱ्यात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने या पदार्थांवर धूळही बसते. या उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्याचा धोका संभवतो.
- रस्त्यावरचे पदार्थ टाळाच !
फिरत्या विक्रेत्यांकडे वस्तू घेतल्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. मुळात हे फिरून माल विकतात, त्यामुळे त्यांच्याकडचे पदार्थ खराब लागले तरीही ते बदलणं अशक्य होतं. दुसरं म्हणजे संबंधितांकडे अन्न प्रशासनाचा विक्रीसाठीचा परवानाही नसतो, त्यामुळे हे पदार्थ खाऊन कोणाला काही त्रास झालाच तर त्याला कोणाला दोष देता येत नाही, कारण ही लोकं शासनाच्या यंत्रणेवर नोंदणीकृतच झालेले नाहीत.
- हंगामी उत्पादकांचे व्यवसाय
अनेक व्यावसायिकांनी हंगामी उत्पादन सुरू केलं आहे. सण समारंभासाठी आवश्यक असणारे पदार्थ मोठ्या संख्येने बनवून ते विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध करून दिले जातात. साखर गाठी, तिळगूळ, लाह्या आदी अनेक गोष्टी आवशक्यतेनुसार बनविले जाते. याचाही कोणाकडे अधिकृत परवाना नसतो. विशेष म्हणजे हे व्यावसायिक यात्रा, उत्सव आणि आठवडा बाजारात आपला माल मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी नेतात.
- अन्न प्रशासनाचे हे आहेत नियम
अन्नपदार्थांची विक्री करणाºया व्यावसायिकांसाठी अन्न प्रशासनाचे कडक नियम आहेत. यात दर सहा महिन्याने कामगारांची आरोग्य तपासणी करणे, कामगारांना कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार नाही, याची खात्री करून घेणे, दर तीन महिन्यांना पाण्याचा नमुना तपासणीसाठी देणे, अन्न तयार होतेय तिथं पेस्ट कंट्रोल करणं आदी नियम सक्तीने पाळावे लागतात. फिरत्या विक्रेत्यांना यापैकी कशाचेच सोयरसुतक नसते.
फिरत्या विक्रेत्यांना हंगामी व्यवसाय करायचा असेल तर त्यांना शंभर रुपये भरून अन्न विक्रीचा परवाना दिला जातो. हा परवाना विक्रेत्यांकडे असणं बंधनकारक आहे. त्याशिवाय त्यांनी विक्री केली तर तो गुन्हा ठरतो.
- अनिल पवार,
अन्न सुरक्षा अधिकारी, सातारा