रात्री ट्रकचालकाला लुटले; सकाळी आरोपींना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:45+5:302021-04-27T04:40:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाढेफाटा उड्डाणपुलावर बंद पडलेला ट्रक उभा असतानाच झोपलेल्या ट्रकचालक आणि क्लिनरला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाढेफाटा उड्डाणपुलावर बंद पडलेला ट्रक उभा असतानाच झोपलेल्या ट्रकचालक आणि क्लिनरला दमदाटी करुन त्यांच्याकडील वीस हजार रुपयांची रक्कम चोरणाऱ्या तिघांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने काही तासांतच अटक केली. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, भंवरलाल नंदराम सेन (४४, रा. सिरोडी, पो. सिरोडी, ता. जि. चित्तोडगड, राजस्थान) हा ट्रकचालक रविवार, दि. २५ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वाढेफाटा उड्डाणपुलावर ट्रक बंद पडल्यामुळे क्लिनर इश्वर बाबुलाल रावत याच्यासमवेत ट्रकच्या केबिनमध्ये झोपला होता. याचवेळी तीन संशयितांनी त्यांना उठविले आणि ट्रकचे दोन्ही दरवाजे उघडून आत प्रवेश करीत ट्रकचालक, क्लिनर यांना दमदाटी करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. या दोघांनी नकार दिला असता एका संशयिताने भंवरलाल यांच्या डोक्यात दगड घातला. यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर या तिघांनीही ट्रकमधील वीस हजार रुपयांची रोकड घेऊन दुचाकीवरून पळून गेले.
याची तक्रार भंवरलाल सेन याने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर तिघा संशयितांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम आणि त्यांच्या पथकाला गुन्हा तत्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाचा पंचनामा करीत मिळालेली माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस संशयित आरोपीपर्यंत पोहोचले.
यानंतर पोलिसांनी सूरज राजू माने (२२, रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा), तेजस संतोष शिवपालक (२१, रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार, सातारा) या दोघांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आली आहे.
या तिघांनी ट्रक चालकाला लुटले असल्याची कबुली पोलिसांजवळ दिली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यापासून काही तासांतच सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.
या कारवाईत पोलीस नाईक अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, जोतीराम पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला.