‘रोहयो’बाबत अधिकारी फैलावर

By admin | Published: December 24, 2014 11:38 PM2014-12-24T23:38:34+5:302014-12-24T23:38:34+5:30

उपजिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा : मिरज पंचायत समितीमध्ये बैठक

'Roho' officer spread over | ‘रोहयो’बाबत अधिकारी फैलावर

‘रोहयो’बाबत अधिकारी फैलावर

Next

मिरज : मिरज तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांसंबंधी अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपजिल्हाधिकारी सुचेता भिकाणे यांनी झाडाझडती घेतली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी बजावले. मिरज पंचायत समितीत सुचेता भिकाणे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी तहसीलदार किशोर घाडगे, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, सहायक गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तालुक्याच्या पूर्व भागातील २९ गावांत रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विहीर, नालाबंडींग, गोठा, क्रीडांगण व बिहार पॅटर्न वृक्ष लागवडीच्या कामांची त्यांनी माहिती घेतली. जत, आटपाडी हे तालुके रोजगार हमी योजनेची कामे राबविण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना रोजगाराचा लाभ मिळत आहे.
मिरज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांच्या प्रस्तावांना १५ दिवसात मंजुरी देण्याची गरज असताना, सहा महिने कामांना मंजुरी दिली जात नसल्याच्या तक्रारीची दखल घेऊन भिकाणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विलंबाबाबत विचारणा केली. रोजगार हमी योजनेची कामे ही सामुदायिकपणे राबविण्यासाठी राज्य शासनाच्या विभागप्रमुखांनीही जबाबदारी घेण्याची गरज आहे. सध्या या कामांचा भार पंचायत समितीवर पडत असल्याचे कारण गटविकास अधिकारी वाघमोडे यांनी सांगितले. यावेळी कामात दिरंगाई करणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले. योजनेच्या कामांची वेळेत पूर्तता करुन संबंधितांना लाभ देण्यात कुचराई केल्यास गय केली जाणार नसल्याचे सुनावले. यावेळी जि. प. व पंचायत समिती सदस्यांनी सरपंच, ग्रामसेवक सहकार्य करीत नसल्याची तक्रार केली. पदाधिकारी व अधिकाऱ्यांत समन्वय असल्याशिवाय रोजगार हमी योजनेच्या कामांना गती येणार नाही. समन्वयाने काम केल्यास तालुक्यात या योजनेचा इतर तालुक्यांपेक्षा प्रभाव दिसेल, अशी सूचना सभापती दिलीप बुरसे यांनी केली. याची दखल घेऊन भिकाणे यांनी सरपंच, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामे करण्याची सूचना केली.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गाव दत्तक योजना संकल्पनाही भिकाणे यांनी मांडली. जि. प. सदस्य प्रकाश देसाई, शंकर पाटील, बाबासाहेब कांबळे, अरूण राजमाने, सतीश नीळकंठ या पंचायत समिती सदस्यांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

गटविकास अधिकाऱ्यांना जाब
मिरज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांच्या प्रस्तावांना १५ दिवसात मंजुरी देण्याची गरज असताना, सहा महिने कामांना मंजुरी दिली जात नसल्याच्या तक्रारीची दखल घेऊन भिकाणे यांनी गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांना विलंबाबाबत विचारणा केली. सध्या या कामांचा भार पंचायत समितीवर पडत असल्याचे कारण वाघमोडे यांनी सांगितले. कामात दिरंगाई करणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले.

Web Title: 'Roho' officer spread over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.