आलं अंगावर, ढकल केंद्रावर हीच राज्य शासनाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:33 AM2021-02-15T04:33:58+5:302021-02-15T04:33:58+5:30
सातारा : ‘केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भरपूर मिळाले आहे. पण, राज्य सरकारला काही करताच येत नाही. त्यामुळे आलं अंगावर की ...
सातारा : ‘केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भरपूर मिळाले आहे. पण, राज्य सरकारला काही करताच येत नाही. त्यामुळे आलं अंगावर की ढकल केंद्रावर, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची झालेली आहे,’ अशी घणाघाती टिका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. दरम्यान, उपाध्ये यांनी कोरोनामध्ये राज्याने सर्वसामान्यांना काहीही मदत केली नसल्याचाही आरोप केला.
येथील शासकीय विश्रामगृहात केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, सुनिशा शहा, आशा पंडित, सिद्धी पवार आदी उपस्थित होते.
केशव उपाध्ये म्हणाले, ‘कोरोनामुळे जगात हाहाकार माजलेला आहे. सर्व देशांची अर्थव्यवस्था मोडकळीस आली असताना केंद्र शासनाने एक आदर्श आणि देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. आर्थिक आणि पायाभूत सुधारणा, गरीब आणि शेतकरी यांचाही विचार या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. कोरोनामुळे आरोग्याचा विषय समोर आला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या तरतुदीत १३७ टक्के वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषी कर्जात वाढ केली आहे.
केंद्राने आदर्श असा अर्थसंकल्प जाहीर केला असलातरी महाराष्ट्र सरकारला काहीच करता येत नाही. त्यामुळे सतत केंद्रावर टीका करण्याचे काम सुरू असते. केंद्रीय अर्थसकंल्पातून महाराष्ट्रालाही भरपूर मिळालेले आहे. तरीही महाराष्ट्राला काहीही मिळाले नसल्याची राज्याची भूमिका आहे. कोणताही आकस न ठेवता राज्याला केंद्राने भरपूर दिले आहे.
इंधन दरवाढीचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर उपाध्ये म्हणाले, ‘महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचा दर सर्वाधिक आहे, याला कारण राज्याचा कर. राज्याने इंधनावरील अधिभार कमी करावा. तसे झाले तरच सर्वांनाच दिलासा मिळेल.’
चौकट :
सातारा पालिका निवडणूक लढविणार...
सातारा नगरपालिकेची निवडणूक भाजप लढविणार का? असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर केशव उपाध्ये यांनी भाजप प्रत्येक नगरपालिका निवडणूक लढवत आहे. मग, सातारा पालिकेची निवडणूक पक्ष १०० टक्केच लढवेल, असे स्पष्टपणे सांगितले.
.................................................................