रुमानियाच्या चोरट्यांचे दिल्लीपासून गल्लीपर्यंत गुन्हे!, ‘एटीएम’मधून पैशांपूर्वी चोरायचे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 06:07 PM2021-12-07T18:07:16+5:302021-12-07T18:08:40+5:30
सुमारे दोन वर्षांपूर्वी ते ‘टुरिस्ट व्हिसा’वर भारतात आले होते. मात्र दिल्लीमध्ये एका गुन्ह्यात ते अडकले. त्याठिकाणी त्यांना अटक झाली.\
संजय पाटील
कऱ्हाड : आर्थिक व्यवहार जेवढे ‘डिजिटल’ होताहेत तेवढेच चोरटेही ‘हायटेक’ होत असल्याचे दिसते. सुमारे दोन वर्षांपूर्वी रोमानियातून भारतात आलेल्या ‘त्या’ दोघांनीही चोरीसाठी अनोखी शक्कल लढवली. बनावट एटीएम कार्डचा वापर करुन त्यांनी अनेकांचे पैसे हडपले. दिल्ली, मुंबईसह अनेक मेट्रो सिटीमध्ये त्यांनी असे गुन्हे केले आणि अखेर कऱ्हाडमध्ये ते गजाआड झाले.
इस्फॅन लुस्टीन जुओर्गल (वय २९) व लुनेट व्हसइल गॅबरिअल (२८, दोघे रा. रुमानिया) अशी या चोरट्यांची नावे आहेत. मलकापुरातील एका एटीएम केंद्रात वेगवेगळ्या कार्डच्या माध्यमातून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असताना या दोघांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे झाले. दिल्लीतून सुरू झालेला या दोघांचा गुन्हेगारीचा प्रवास कऱ्हाडपर्यंत पोहोचला असून त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये गुन्हे केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस येत आहे.
पोलिसांनी अटक केलेले इस्फॅन व लुनेट हे दोघेही रोमानिआ देशाचे रहिवासी आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी ते ‘टुरिस्ट व्हिसा’वर भारतात आले होते. मात्र दिल्लीमध्ये एका गुन्ह्यात ते अडकले. त्याठिकाणी त्यांना अटक झाली. त्यामुळे त्यांच्या व्हिसासह इतर कागदपत्रे न्यायालयात जमा करण्यात आली. दिल्लीतील त्या गुन्ह्यातून त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते तेथून बाहेर पडले आणि देशातील वेगवेगळ्या शहरात ठराविक कालावधीसाठी त्यांनी वास्तव्य केले असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे.
कोल्हापूरमध्ये २५ नोव्हेंबरपासून वास्तव्य
आरोपींकडील कार्ड एकाच रंगाचे असून त्यावर काहीही लिहिलेले नाही. त्यामुळे कोणत्या कार्डचा पिन क्रमांक किती आहे, हे समजण्यासाठी त्यांनी त्या कार्डवर पांढरे स्टिकर चिटकवले असून स्टिकरवर पिन क्रमांक लिहिला आहे. कोल्हापुरात हे आरोपी २५ नोव्हेंबरपासून वास्तव्यास होते. तेथील एका सहकारी बँकेच्या एटीएम केंद्रातून वारंवार त्यांनी पैसे काढले. त्यावेळी तक्रारी वाढल्यामुळे संबंधित बँकेने त्यांच्या एटीएम केंद्रात केवळ त्यांच्याच बँकेचे एटीएम चालेल, अशी सिस्टिम केली आणि कोल्हापुरात पैसे काढण्यास अडचणी येऊ लागल्यामुळे आरोपी कऱ्हाडमध्ये सहकारी बँकांचे एटीएम शोधत आले होते.