जिल्हा रुग्णालयात कक्षसेवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:38 AM2021-01-25T04:38:47+5:302021-01-25T04:38:47+5:30
सातारा : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात असणाऱ्या कोविड-१९ अतिदक्षता विभागात रुग्णाच्या नातेवाईकासोबत आलेल्या दोन युवकांनी ड्युटीवर असणारे कक्षसेवक ...
सातारा : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात असणाऱ्या कोविड-१९ अतिदक्षता विभागात रुग्णाच्या नातेवाईकासोबत आलेल्या दोन युवकांनी ड्युटीवर असणारे कक्षसेवक निहाल सय्यद यांना मारहाण करून दोन परिचारिकेंना शिवीगाळ केली. याप्रकरणी दोन अज्ञात युवकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ अतिदक्षता विभाग आहे. शुक्रवार, दि. २२ रोजी कक्षसेवक निहाल पापाभाई सय्यद (वय ३०, रा. त्रिमूर्ती बिल्डिंग, विसावा पार्क, सातारा, मूळ रा. लोणंद, ता. खंडाळा) आणि दीक्षा तसेच सोनाली ठोंबरे या परिचारिका ड्युटीवर होत्या. यावेळी पंचवीस ते तीस वयोगटातील दोघा अनोळखी व्यक्तींनी त्यांना तसेच अन्य स्टाफला शिवीगाळ केली. ''तुम्ही हॉस्पिटलवाले स्वत:ला काय समजता, सिव्हिल हॉस्पिटल यांच्या बापाचे आहे काय, असे म्हणत गोंधळ घातला. हे दोन्ही युवक गोंधळ घालत कक्षसेवक निहाल यांच्या शेजारुन जात असताना त्यांच्याकडे पाहिले म्हणून या दोघांनी दमबाजी केली. ''आमच्याकडे काय पाहतोस,'' असे म्हणून निहाल यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. हा प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेल्या नर्स दीक्षा आणि सोनाली यांनी त्या दोन युवकांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही शिवीगाळ केली.
अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.