‘खुल्या’साठी रस्सीखेच; ‘ओबीसी’साठी शोधाशोध!

By admin | Published: October 11, 2016 12:03 AM2016-10-11T00:03:03+5:302016-10-11T00:21:08+5:30

निवडणूक चाहूल : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना आणि मनसेचीही चाचपणी; इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग--कोपर्डे हवेलीझेडपी गट

Rope for 'open'; Hunt for 'OBC'! | ‘खुल्या’साठी रस्सीखेच; ‘ओबीसी’साठी शोधाशोध!

‘खुल्या’साठी रस्सीखेच; ‘ओबीसी’साठी शोधाशोध!

Next

शंकर पोळ --- कोपर्डे हवेली --कऱ्हाड तालुक्यात दक्षिण व उत्तर असे विधानसभेचे दोन मतदार संघ आहेत. पैकी उत्तर विधानसभा मतदार संघात येणारा कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पुरुषांसाठी खुला असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. तसेच कोपर्डे हवेली गणही खुला तर वाघेरी गणात ओबीसी पुरुष आरक्षण पडल्याने या मतदार संघावरती पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळणार आहे; पण इच्छुकांची भाऊगर्दी पाहता उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची डोकेदुखी वाढणार, हे निश्चित.
कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट हा कऱ्हाड शहरालगत व सह्याद्री सहकारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो. राजकीयदृष्ट्या येथील मतदार जागृक पाहायला मिळतात. ही जागृती येणाऱ्या निवडणुकीतही निश्चितच पाहायला मिळेल.
कोपर्डे हवेली गटातील गणात कोपर्डे हवेलीसह उत्तर कोपर्डे, यशवंतनगर, नडशी, शिरावडे, पिंपरी, शहापूर आदी गावांचा समावेश आहे. दोन्हीही ठिकाणी सर्वसाधारण पुरुष जागेसाठी आरक्षण असल्याने मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, काका गट आदी गटांचे उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक जणांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये नडशीचे उपसरपंच निवास थोरात, कोपर्डे हवेलीचे उपसरपंच नेताजी चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सुहास बोराट, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, माजी उपसरपंच लालासाहेब चव्हाण, युवक काँग्रेसचे कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष शैलेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सिद्धार्थ चव्हाण आदी चर्चेत आहेत. तर जुना करवडी गण बदलून वाघेरी गणामध्ये ओबीसी पुरुष आरक्षण असल्याने याठिकाणी इच्छुकांची स्पर्धा कमी दिसते. मात्र, मनोज माळी मनसेच्या इंजिनमध्ये बसून ही निवडणूक लढवू इच्छितात. काँग्रेस, राष्ट्रवादी मात्र नेमकी कोणाला संधी देणार, हे अद्याप सांगता येत नाही. या गणामध्ये वाघेरी, करवडी, सुर्ली, कामथी, पाचुंद, मेरवेवाडी, शामगाव, अंतवडी, वडोली निळेश्वर, रिसवड आदी गावांचा समावेश आहे.
कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात एकूण सतरा गावांचा समावेश आहे. समोरासमोर लढती होणार की आघाड्या होणार हे चित्र अद्याप स्पष्ट नसल्याने या गट, गणामध्ये गावागावांत चर्चा मात्र रंगल्या आहेत. कोपर्डे हे गाव गटात सर्वात मोठे असल्याने प्रत्येक पक्ष उमेदवार देताना समोरासमोर उमेदवार देतात. म्हणून गटात की गणात उभे राहायचे, असा इच्छुकांच्यात संभ्रम आहे. मागील तीन पंचवार्षिक लढतीचा मागोवा घेतल्यास तिन्ही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने गट आणि गणात बाजी मारली आहे. अपवाद फक्त त्यावेळेच्या करवडी गणातून भीमराव डांगे काँग्रेसमधून विजयी झाले होते. बहुरंगी लढती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याचे जाणकार बोलत आहेत. तर दुरंगी लढती झाल्यास राष्ट्रवादीला जोमाने काम करावे लागणार आहे. राजकारणामध्ये कोण कुणाचा कायमचा शत्रू नसतो. तसाच कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो. सत्तेसाठी कायपण अशी अवस्था येत्या काही दिवसांत कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात पाहावयास मिळणार आहे. आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गातील असल्याने डझनभर उमेदवार इच्छुक आहेत. अजूनही इच्छुकांची संख्या वाढणार आहे. पुन्हा आरक्षण सर्वसाधरण प्रवर्गाला कधी येईल ते सांगता येत नाही. त्यामुळे काहीही झाले तरी उभे राहायचेच, अशा मन:स्थितीत आहेत.
या गटाचा भौगोलिक विचार करता कोपर्डे गण बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो तर वाघेरी गण काही अंशी जिरायती पट्टा म्हणून ओळखला जातो. आत्तापर्यंत जिल्हा परिषद सदस्य कोपर्डे हवेली गावाचे झाले आहेत.


कमळ फुलविण्यासाठी होणार प्रयत्न!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम करीत मनोज घोरपडे यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. कऱ्हाड उत्तर मतदार संघात जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचा अगोदरच चांगला संपर्क आहे. त्यातच मनोज घोरपडे आणि पावसकर यांनी एकत्र येऊन भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार उभे केल्यास ते चांगल्या पद्धतीने लढत देऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, शिवसेना या ठिकाणी पक्षचिन्हावर उमेदवार उभे करणार का आणि केले तर उमेदवार कोण, हे समजायला मार्ग नाही.

Web Title: Rope for 'open'; Hunt for 'OBC'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.