वळणावरची गोल रेल्वे धावणार सरळ रेषेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:56 AM2019-01-17T00:56:42+5:302019-01-17T00:57:30+5:30
मिरज-पुणे लोहमार्गावर ब्रिटिशकालीन मीटर गेज लोहमार्ग बंद झाल्यानंतर स्वातंत्रकाळात ब्रॉडगेज लोहमार्ग सुरू झाला. त्यावेळी आंबळे, शिंदवने, जेजुरी, दौडज, वाल्हे, सालपे, आदर्की, वाठार स्टेशन या ठिकाणी
आदर्की : मिरज-पुणे लोहमार्गावर ब्रिटिशकालीन मीटर गेज लोहमार्ग बंद झाल्यानंतर स्वातंत्रकाळात ब्रॉडगेज लोहमार्ग सुरू झाला. त्यावेळी आंबळे, शिंदवने, जेजुरी, दौडज, वाल्हे, सालपे, आदर्की, वाठार स्टेशन या ठिकाणी डोंगरातून, बोगद्यातून गाडी जाताना फोटो काढण्याचा मोह प्रवाशांना आवरत नसे. आता लोहमार्गाच्या दुपदरीकरणामुळे फेरबदल होऊन रुंदीकरण होणार असल्याने प्रवाशांना मिळणारे नयनरम्य दृश्य पडद्याआड जाणार असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे.
मिरज-पुणे लोहमार्ग ब्रिटिशकाळात मीटर गेज सुरू होता. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९६५ च्या दरम्यान जुन्या मीटर गेज लोहमार्गाशेजारून दुसरा ब्रॉडगेज लोहमार्ग टाकण्यात आला. त्यावेळी एकही तास मीटर गेज रेल्वेलाईन बंद न ठेवता ब्रॉडगेज लोहमार्ग सुरू केला होता.
ब्रॉडगेजवर आंबळे, शिंदवणे, आदर्की येथे तीन बोगदे व जुना आदर्कीजवळ बोगद्याची रुंदी, उंची वाढवून त्यामधूनच लोहमार्ग सुरू केला होता. हा लोहमार्ग डोंगर-दऱ्यातून जात असल्याने पावसाळ्यात ठिकठिकाणी धबधबे पाहावयास मिळतात. त्याबरोबर रेल्वे डब्यात बसले तर पाठीमागचा शेवटचा डबा पूर्ण पाहता येतो, अशी वळणे आहेत. त्यामुळे मिरज-पुणे लोहमार्ग पावसाळ्यात पर्यटन म्हणून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असत. त्यावर काही विद्यार्थी अभ्यासासाठी पॅसेंजर गाडीने प्रवास करीत असताना नयनरम्य ठिकाणे पाहून फोटोशन करताना पाहावयास मिळत असे.
आता मिरज-पुणे लोहमार्गाचे दुपदरीकरण होणार असल्याने जुन्या मीटर गेज लोहमार्गाच्या माती भरावावरून काही ठिकाणी दुरुस्ती करून लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. त्यामुळे ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण होणार आहे.
पावसाळ्यात कोणाचा फिल..
पॅसेंजर गाडींना तिकीटही कमी आहे. आदर्कीहून पुण्याला जायचे म्हटले तर फक्त २२ रुपये तिकिटाचे दर आहे. आदर्की-सालपे-वाठारपर्यंत मोठ्या प्रमाणात ‘एस’ वळणे, त्याबरोबर दोन बोगदे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कोकणात आल्याचे फिल प्रवाशांना येतो.
मिरज-पुणे लोहमार्गावर आदर्कीजवळचे नयनरम्य दृश्य आता वळणाच्या दुपदरीकरणामुळे काळाच्या पडद्याआड जाणार आहे.