साताऱ्यातील फेरीवाल्यांना २५०० रुपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:38 AM2021-04-17T04:38:42+5:302021-04-17T04:38:42+5:30
सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरीवाल्यांसाठी जाहीर केलेली १५०० रुपयांची मदत आणि सातारा पालिकेच्या स्वनिधीतून एक हजार असे ...
सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरीवाल्यांसाठी जाहीर केलेली १५०० रुपयांची मदत आणि सातारा पालिकेच्या स्वनिधीतून एक हजार असे २५०० रुपये पात्र फेरीवाल्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. सातारा शहरातील तब्बल १ हजार ६२१ पात्र फेरीवाल्यांना याचा लाभ मिळणार आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे की, सातारा शहरातील पात्र फेरीवाल्यांना मदत करण्यामध्ये सातारा पालिका कुठेही कमी पडणार नाही. सातारा शहरातील १ हजार ६२१ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण यापूर्वीच झाले आहे. ७५४ पथविक्रेत्यांना पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेत दहा हजारांची रक्कम यापूर्वीच प्रदान करण्यात आली आहे. तर ८६७ फेरीवाल्यांची मंजूर प्रकरणे अनुदान प्राप्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरीवाल्यांना १५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम तुटपुंजी असली तरी दिलासा देणारी आहे. म्हणूनच त्या रकमेत पालिकेच्या स्वनिधीतून एक हजार रुपये देण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सातारा शहरातील फेरीवाल्यांच्या खात्यावर लवकरच अडीच हजार रुपये जमा होतील, अशी अपेक्षा आहे. कोणतीही पात्र व्यक्ती या मदतीपासून वंचित राहणार नाही, असेही खा. उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
(चौकट)
टीका करणाऱ्यांनी माहिती घ्यावी
फेरीवाल्यांप्रती असणाऱ्या सहानुभूतीमुळे टीका करणाऱ्यांनी थोडीजरी माहिती घेतली असली तरी त्यांना सगळी वस्तुस्थिती समजली असती. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत अकारण संभ्रमावस्था निर्माण होण्यास हातभार न लावता संबंधितांनी प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे. सातारा शहरातील फेरीवाले व गोरगरिब आमच्या कुटुंबातील सदस्य असून, पात्र फेरीवाल्यांना लाभ देण्यास आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असेही खा. उदयनराजे यांनी शेवटी नमूद केले आहे.