२५ वर्षांसाठी १९० कोटींचा आराखडा मंजूर

By admin | Published: March 29, 2015 10:14 PM2015-03-29T22:14:12+5:302015-03-30T00:25:24+5:30

नऊ विषयांवर एकमत : मलकापूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल --नगरपंचायत विशेष सभा

Rs.190 crores approved for 25 years | २५ वर्षांसाठी १९० कोटींचा आराखडा मंजूर

२५ वर्षांसाठी १९० कोटींचा आराखडा मंजूर

Next

मलकापूर : मुंबईच्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने मलकापूर शहराचा भविष्यातील २५ वर्षांचा विकासआराखडा तयार केला आहे. १८९ कोटी ८४ लाखांचे विकास नियोजन शासनाकडे सादर करण्यास झालेल्या विशेष सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा साठे होत्या. विषय वाचन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. मुख्याधिकारी राजेंद्र तेलींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी मयत कर्मचारी अमोल दोडमनी याला श्रद्धांजली वाहून कामकाजास सुरुवात केली. विषय पत्रिकेवरील सात विषयांसह ऐनवेळच्या दोन अशा नऊ विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सामाजिक, आर्थिक व जातनिहाय प्रारूप याद्या अवगत करणे, नळपाणीपुरवठा योजनेच्या मीटर पुरवठ्यासाठी निविदा मंजूर करणे, शिक्षण व रोजगार हमी कर हे ‘क’ वर्ग नगरपालिका वि नगरपंचायत क्षेत्राला माफ करावा किंवा भाडेमूल्यावर न आकारता तो कर योग्य रकमेवर आकारावा, हा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, करवसुली व पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेणे आदी विषय एकमताने मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक सहा हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असल्याचे उपनगराध्यक्ष शिंदे यांनी सभागृहात सांगितले. मुंबईच्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने मलकापूरचा भविष्यातील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. असा विकास आराखडा तयार करणे व त्याला शासनाची मंजुरी घेणे बंधनकारक केले आहे. भविष्यात कोणत्याही कामांचा विकास प्रस्ताव मंजूर करावयाचा झाल्यास या आराखड्याची मंजुरी घेणे गरजेचे आहे. तरच शहराला शासनाचा निधी मिळू शकातो. म्हणून मलकापूरचा १८९ कोटी ८४ लाखांचा शहर विकास आराखडा तयार केला आहे. तो शासनास सादर करण्यास सभागृहाची मंजुरी द्यावी. त्यावेळी आराखडा वाचून दाखविण्याची मागणी नगरसेवकांनी केली. वाचनानंतर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पंचवीस वर्षांचे विकास नियोजन करणारी पहिलीच नगरपंचायत आहे. (प्रतिनिधी) बघण्याचा दृष्टिकोन बदलला मलकापुरात अनेक नावीन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. याची दखल घेऊन सर्वच पातळीवरून मलकापूर शहराकडे शासन व प्रशासनाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. लवकरच मलकापूरचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये सहभाग होईल, असा विश्वास उपनगराध्यक्ष शिंदे यांनी व्यक्त केला. तशा पद्धतीने हालचालीही सुरू आहेत. डी. पी.मध्ये अनेक प्रस्ताव मलकापूरसाठी भविष्यातील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यामधील काही बाबी मलकापूरने अगोदरच अंमलात आणल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. तर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. २५ वर्षांत काय भविष्यात २५ वर्षांत तुम्ही काय विकास करणार याची यादी- सार्वजनिक सुविधा प्रभावीपणे पुरवणे, झोपडपट्टी निर्मूलन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, दळणवळण, पर्यावरण, मूलभूत नागरी सुविधा, स्वतंत्र बांधकाम नियमावली, ई-गव्हर्नंन्स पद्धत, शेती सुधार, पर्यटन, पथदिवे व्यवस्थापन व डेव्हलपमेंट प्लॅनमधील आरक्षणांचा विकास करणे यांचा समावेश आहे.

Web Title: Rs.190 crores approved for 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.