आपत्तीला भिडणार रबर बोट, फ्लोटिंग पंप

By admin | Published: June 14, 2015 11:54 PM2015-06-14T23:54:15+5:302015-06-14T23:55:32+5:30

नियंत्रण कक्ष सक्रिय : पोलिसांसह गृहरक्षकदलाचे ३६ जवान तैनात

A rubber boat, a floating pump, to the disaster | आपत्तीला भिडणार रबर बोट, फ्लोटिंग पंप

आपत्तीला भिडणार रबर बोट, फ्लोटिंग पंप

Next

जगदीश कोष्टी, सातारा : पसरणी घाटात दरड कोसळली... केळघर घाटात दरड कोसळल्याने वाहतूक वळविली... किंवा कोयना धरणातून पाणी सोडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, अशा बातम्या प्रत्येक पावसाळ्यात प्रसारमाध्यमातून झळकत असतात. नैसर्गिक आपत्ती कोणाला सांगून येत नसते; पण कसलीही आपत्ती आली तरी दोन हात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
सातारा जिल्ह्यात नैसर्गिक असमतोल नेहमीच जाणवत असतो. जिल्ह्यात सर्वच ॠतू चांगले असतात. महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, तापोळा, नवजा येथे दररोज सरासरी शंभरहून अधिक मिलीमीटर पाऊस पडत असतात. सातारा, कऱ्हाड, पाटण, खंडाळा, वाई या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यामुळे अनेकदा सामान्य जनजीवन विस्कळीत होत असते.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाबळेश्वर, वाई, जावळी, सातारा तालुक्यांतून डोंगररांगा गेल्या आहेत. या तालुक्यांत मुसळधार पाऊस पडत असतो. पावसाचे पाणी डोंगरात झिरपल्यामुळे व वाहतुकीमुळे दरडी कोसळण्याचे प्रकार सतत घडत असतात. यामध्ये वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाट, सातारा-महाबळेश्वर मार्गावर केळघर घाट तर महाबळेश्वर-महाड रस्ता तसेच सातारा-ठोसेघर मार्गावर बोरणे घाटात दरड कोसळण्याचे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. पसरणी घाटात गेल्यावर्षी महाकाय दगड रस्त्यावर पडला होता. हा दगड माणसांना हटविणंही शक्य नव्हता. तेव्हा जेसीबीच्या साह्याने दगड फोडून बाजूला करावा लागला होता.
कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. महाबळेश्वर, तापोळा, नवजा येथे एका-एका दिवसात दीडशे ते दोनशे मिलीमीटरपर्यंत पाऊस पडत असतो. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सहा वक्री दरवाजातून पाणी सोडावे लागते. कोयनानदी दुथडी भरून वाहते तेव्हा काठावरील असंख्य गावांना धोक्याचा इशारा दिला जातो. अनेकवेळा गावे संपर्कहीन होतात. अशावेळी शासनाचा आपत्कालीन विभाग मदतीसाठी धावून येतो.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नुकतीच आपत्कालीन विभागाची बैठक घेऊन सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका पातळीवर आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय केला आहे. हा विभाग चोवीस तास काम करत राहणार आहे. कोणत्याही गावात नैसर्गिक संकट ओढावल्यास तेथील कर्मचारी किंवा नागरिकांनी संबंधित तहसील कार्यालय किंवा आपत्कालीन विभागाला संपर्क साधून माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतर काही तासांतच मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कोणत्याही गावात नैसर्गिक संकट आल्याची माहिती मिळाल्याबरोबर सर्वात प्रथम जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती देऊन पोलीस पाठविले जातात. त्यानंतर संबंधित विभागाचे कर्मचारी साधनसामुग्रीसह मदतीला जाणार आहेत. यासाठी गृहरक्षक दल व पोलीस यांचा ३६ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाला आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी येईल, असे साहित्य पुरविले आहे. मदतकार्यात स्थानिक तरुण, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांचीही मदत घेतली जाणार आहे.

Web Title: A rubber boat, a floating pump, to the disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.