रबर लागवडीला जिल्ह्यात बंदी

By admin | Published: September 6, 2015 08:54 PM2015-09-06T20:54:37+5:302015-09-06T20:54:37+5:30

दीपक केसरकर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कुडाळचा विकास करणार

Rubber cultivation in the district | रबर लागवडीला जिल्ह्यात बंदी

रबर लागवडीला जिल्ह्यात बंदी

Next

कुडाळ : कुडाळचा विकास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येईल. विकास करताना कोणताही प्रश्न आल्यास तो प्रश्न तातडीने सोडवून विकास साधला जाईल. तसेच जिल्ह्यात रबर लागवडीसाठी बंदी घालण्यात आली असून, प्रदूषणकारी रबरऐवजी फळझाडांची लागवड करावी, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळच्या विकासासंदर्भात पालकमंत्री केसरकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, माजी उपसभापती बबन बोभाटे, पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, गटविकास अधिकारी जयवंत उगले, शिवसैनिक व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री केसरकर म्हणाले, कुडाळ शहर व तालुक्याचा विकास झपाट्याने होण्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. येथील रस्ते, आरोग्य, पाणी इतर पायाभूत, मूलभूत सोयीसुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी येत्या काही दिवसांत येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या विकासकामांना सुरुवात होणार आहे. कुडाळ नगरपंचायत झाली असून, नगरविकास आराखड्यावेळी अनेक विकासकामे मंजूर होतील. तसेच आताही प्रशासक असला, तरी येथील विकासकामे करण्यात येणारच आहेत. कुडाळ ही व्यापारी बाजारपेठ असून, तीही विकसित करण्यात येणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने कर्ली नदीकिनाऱ्यालगतच्या नेरूर, वालावल गावांमध्ये बॅक वॉटरची सुविधा लवकरच निर्माणकरण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी तर ऐतिहासिक घोडेबंदराकरिताही निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील शिवकालीन रांगणागड व शिवापूर-पाटगाव जोडणारा रस्ता होण्यासाठी सर्व्हे सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.जिल्ह्यात रबर लागवडीचे प्रमाण वाढत असून, रबर लागवडीकरिता मोठ्या प्रमाणात अन्य वृक्षांची तोड केली जात आहे. रबरच्या झाडाला फळेही लागत नाहीत किंवा त्याचा अन्य वापर होत नाही. तो प्रदूषणकारी आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापुढे रबर लागवडीवर बंदी घालण्यात आली असून, रबराऐवजी फळझाडांची लागवड करा, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले.यावेळी केसरकर यांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाला भेट देत ग्रामीण रुग्णालयातील सद्य:स्थितीचा आढावा घेतला. तसेच तापसरीच्या रुग्णांची विचारपूस केली व आवश्यक त्या सूचना आरोग्य विभागाला केल्या. यावेळी कुडाळातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या पालकमंत्र्यांकडे मांडल्या. (प्रतिनिधी)

नदीपात्रात बंधारे बांधणार
टाळंबा धरण अद्याप पूर्णत्वास नाही. मात्र, याठिकाणी पाण्याची पातळी चांगली राहण्यासाठी तालुक्यातील नदीपात्रामध्ये कमी खर्चात बंधारे बांधण्याचे नियोजन सुरू असून, यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातून एक समिती कोकण विद्यापीठाला गेली होती, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.

Web Title: Rubber cultivation in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.