शिधापत्रिका ‘आॅनलाईन’चा गोंधळात गोंधळ !
By Admin | Published: July 2, 2015 10:40 PM2015-07-02T22:40:06+5:302015-07-02T22:40:06+5:30
दुकानदार देतायत ‘डेडलाईन’ : पुरवठा विभाग-दुकानदारांमध्ये सुसंवादाचा अभाव; कार्डधारकांची कागदपत्र जुळवाजुळवीसाठी ससेहोलपट
शंकर पोळ- कोपर्डे हवेली -सर्वच क्षेत्रांमध्ये ‘आॅनलाईन’चा फंडा राबविला जात असताना शिधापत्रिकाही आॅनलाईन करण्याची प्रक्रिया पुरवठा विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार रेशनिंग दुकानदार लाभधारकांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगत आहेत. वेळोवेळी वेगवेगळी कागदपत्रे कार्डधारकांना जमा करावी लागत असल्याने कार्डधारकांच्यात गोंधळाची अवस्था आहे. तसेच या आॅनलाईनच्या प्रक्रियेला कोणतीही कालमर्यादा नसताना दुकानदार कार्डधारकांना कागदपत्र जमा करण्यासाठी डेडलाईन देत असल्याने सामान्यांची चांगलीच धावपळ उडत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शासन रेशनकार्ड धारकांना वेठीस धरत आहेत. दोन-तीन महिन्यांत वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे मागविली जात आहेत. कार्डधारकांकडून संबंधित कागदपत्रे रेशनिंग पुरवठाधारकांना दिली जातात. कागद गोळा करण्याची मुदत अल्प असल्याने काही रेशनकार्डधारक परगावी असल्याने त्यांची तारांबळ उडते. अशातच प्रथम मागवलेली कागदपत्रे जमा करीत असताना पुन्हा दुसरीच कागदपत्रे देण्यास सांगितल्याने गोंधळात आणखी भर पडते. मध्यंतरी गॅस सिलिंडरचा ‘केवायसी’ फॉर्म भरून देण्यासाठी गॅसधारकांची धावपळ सुरू होती. त्यावेळी अनेक लोकांनी त्रागाही व्यक्त केला.
रेशनिंग व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सध्या तालुक्यात ‘आॅनलाईन’ रेशनकार्डची प्रणाली राबविण्यात येत आहे. त्यासाठी कुटुंबप्रमुख म्हणून महिलांचे बँकेचे खाते महत्त्वाचे आहे. मात्र, पुरवठा विभाग आणि रेशनिंग धान्य दुकानदार यांच्यात एक वाक्यता नसल्याने कार्डधारकांना वेळोवेळी वेगळीच माहिती मिळत आहे.महिलेचा आयडेंटी फोटो आणि पुरुषांचे बँक खाते चालते, असे समजल्यानंतर अनेक कार्डधारकांनी आपली कागदपत्रे रेशन धान्य दुकानदारांकडे जमा केली; पण नंतर ही कागदपत्रे चालत नसून महिलांचेही बँक खाते आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खाते उघडण्यासाठी बँकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. खाते उघडल्यानंतर शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आधारकार्ड आवश्यक आहे. मतदानाचा अधिकार असणाऱ्यांचे मतदान ओळखपत्र, शिधापत्रिकेची झेरॉक्स, तसेच मतदान ओळखपत्र नसल्यास लाईटबिल, घरफळा पावती, टेलीफोन बिल यापैकी काही कागदपत्रांच्या झेरॉक्स देणे आवश्यक आहे. वारंवार वेगवेगळी कागदपत्रे मागितली जात असल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
काय पाहिजे, एकदाच सांगा !
कागदपत्रे गोळा करीत असताना कार्डधारकांना त्रास होतो. उद्योग सोडून कागदपत्रे जुळविण्याचे काम करावे लागते. काय कागदपत्रे द्यावयाची आहेत, ती एकदाच ठरवावी. तसेच एक वेळ कागदपत्रे दिल्यावर ती कागदे गहाळ होता कामा नयेत, अशी रेशनकार्डधारकांची मागणी आहे.
परगावी वास्तव्यास असणाऱ्यांची कसरत
रेशनकार्डधारक गाव सोडून बाहेरगावी नोकरीसाठी, व्यवसायासाठी असताना त्यांना वेळेत माहिती मिळत नाही. परिणामी, त्यांची कागदपत्रे वेळेत जमा होत नाहीत. कागदपत्रे वेळेत जमा केली नाहीत म्हणून त्यांना प्रशासनाकडून सोयीसुविधाही मिळत नाहीत. तसेच कागदपत्रे जमा करण्यास उशीर केला तर दुकानदारही त्यांच्यावर तोंडसुख घेतात. त्यामुळे परगावी वास्तव्यास असणाऱ्यांची सध्या खरी कसरत सुरू आहे.
आधारकार्डसाठी धावपळ
अनेक ग्रामस्थांनी आधारकार्ड काढली आहेत. त्यांच्याजवळ पोहोच आहे; पण आधारकार्ड त्यांना मिळालेले नाही. त्यामुळेही संभ्रमावस्था निर्माण होत आहे. अनेकजण आधारकार्ड काढण्यासाठी कऱ्हाडवारी करीत आहेत. आधारकार्ड केंद्रावर सध्या गर्दी दिसून येत आहे.
सध्या शेती कामाचे दिवस आहेत. पेरणी, टोकणी आदी कामे शिवारात सुरू आहेत. त्यामध्येच शिधापत्रिका आॅनलाईनसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करावी लागत आहेत. या कामासाठीही वेळात वेळ काढून धावपळ करावी लागत आहे. हा प्रकार त्रासदायक आहे. कागदपत्रे जमा करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात यावी.
- लक्ष्मण चव्हाण, शिधापत्रिकाधारक, कोपर्डे हवेली
शिधापत्रिका आॅनलाईनसाठी रेशनिंग दुकानदारांकडे कागदपत्रे जमा करायची आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे.
- बी. एम. गायकवाड, नायब तहसीलदार, कऱ्हाड