‘प्रवाशांच्या सेवेसाठी’चे नियम झाले बिनकामाचे !

By admin | Published: May 12, 2016 10:16 PM2016-05-12T22:16:33+5:302016-05-13T00:16:39+5:30

कऱ्हाड आगाराची स्थिती : नियम राहिले केवळ नावापुरते; आरक्षित आसन व्यवस्थेकडे महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष

The rule of 'passengers for the service' was made! | ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’चे नियम झाले बिनकामाचे !

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’चे नियम झाले बिनकामाचे !

Next

कऱ्हाड : सध्या राज्यपरिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी निर्माण करण्यात आलेल्या अनेक योजना, नियमांचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य प्रवाशांव्यतिरिक्त इतर असलेल्या शासकीय, विशेष व्यक्ती व स्वातंत्र्य सैनिक, अपंग व्यक्तीसाठी एसटीत ठराविक आसने आरक्षित करण्यात आली. मात्र, त्याचा योग्य तो वापर सध्या होताना दिसून येत नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी करण्यात आलेल्या नियमांचे खुद्द प्रवाशांकडूनच उल्लंघन होत आहे.
याबाबत राज्य परिवहन महामंडळाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. सध्या कऱ्हाड आगारातील प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असून, त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी या-ना त्या कारणाने वारंवार चर्चेत असते. सध्या एका सामान्य पण हिताच्या कारणाने एसटी चांगलीच चर्चेत आहे. ते म्हणजे प्रवाशांसाठी बसण्यासाठी एसटी गाडीत करण्यात आलेली आरक्षित जागा. एसटी बसेसमध्ये सर्वसामान्य प्रवासी सोडले तर इतर विशेष अशा दहा प्रवाशांसाठी राखीव जागा आरक्षित केलेल्या असतात.
एसटी गाड्यांमध्ये विधानमंडळ सदस्य, अपंगासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, स्वातंत्र्य सैनिक, संकटकालीन मार्ग, महिलांसाठी, पत्रकारांसाठी, राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी, वाहकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या प्रमुख जागा आरक्षित केलेल्या आहेत. मात्र, प्रवाशांकडून सध्या त्या आरक्षित केलेल्या जागांचे नियम पाळले जात नाही. तसेच त्यांना याबाबत योग्य त्या सूचनाही वाहकांकडून केल्या जात नसल्याचे दिसून येते.
आरक्षित जागेवर बसण्यावरून महिला व पुरुषांमध्ये अनेकवेळा वादावादीचे प्रसंग घडतात. मात्र, त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात वाहकाकडून पुढाकार घेतला जातो. मात्र, याबाबत कायमस्वरूपी नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
अनेकवेळा प्रवाशांकडून एसटीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामध्ये वाहक व चालकांचाही समावेश असतोच. धुम्रपान करू नये, मोबाईल वापरू नये, स्वच्छता राखावी, खिडकीतून हात बाहेर काढू नये, अशा अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन हे केले जाते. याबाबत वाहकांकडून तसेच चालकांकडून काहीच उपाय केले जात नाही.
सध्या बसगाडीमध्ये महिलांना बसण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या बैठकीच्या जागेवर पुरुष तसेच विद्यार्थी बसतात. तर अपंगाच्या, संकटकालीन मार्गाच्या जागी कोणीही बसलेले दिसून येते. त्यामुळे गाडीत प्रवास करण्यासाठी आलेल्या अपंग प्रवाशाला त्याची हक्काची जागा असून, देखील बसता येत नाही. किंवा त्यांनी वाहकाला विनंती केत्यास त्यांच्याकडूनही लक्ष दिले जात नाही, अशा अनेक नियमांकडे राज्य परिवहन महामंडळाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे विद्यार्थी व प्रवासी सांगत आहेत.
सध्या कऱ्हाड बसस्थानकातील प्रशासनाकडून अशा नियमांची कडक स्वरूपात अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नियमांची अंमलबजावणी न केल्यास एसटीचा मुख्य उद्देश साध्य होणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The rule of 'passengers for the service' was made!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.