रेल्वेच्या आगमनानं फलटणकर पुलकित
By admin | Published: March 3, 2017 11:39 PM2017-03-03T23:39:36+5:302017-03-03T23:39:36+5:30
गतीची चाचणी : तरडगाव, सुरवडी, फलटणमध्ये नागरिकांच्यात उत्साहाचे वातावरण
फलटण : फलटणच्या जनतेचे रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरवण्याच्या दृष्टीने रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल शुक्रवारी उचलले. लोणंद ते फलटण रेल्वेमार्गावर रेल्वे वेग व मार्गाच्या क्षमतेची चाचणी घेण्यात आली. यानिमित्ताने फलटण रेल्वे स्थानकातून रेल्वे धावली.
फलटणमधून रेल्वे सेवा सुरू व्हावी, यासाठी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी मोठा संघर्ष केला. लोकसभेत वेळोवेळी आवाज उठवून या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळविली. त्यानंतरही काम पूर्ण होईपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच होता. याची परिणीती लोणंद ते फलटण रेल्वेमार्ग पूर्ण होण्यात झाली. रेल्वे विभागाकडून या मार्गावर वारंवार रेल्वे इंजिनच्या चाचण्या घेतल्या. संपूर्ण रेल्वे गाडीच्या वेगाची अंतिम चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. यासाठी मुंबईहून विशेष गाडी आली होती.
रेल्वेचे पूजन कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, पत्नी जिल्हा परिषद सदस्या अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोणंद ते फलटण मार्गावर या गाडीत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेगाडीच्या वेगावर वेगवेगळ्या चाचणी करण्यापूर्वी छोट्या इंजिनद्वारे काटेकोरपणे पाहणी केली. रेल्वे सुरू होण्याच्या दृष्टीने या मार्गाची अंतिम चाचणी महत्त्वाची असल्याने रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी या मार्गाची बारकारईने पाहणी करताना दिसत होते. याचा अहवाल दिल्ली येथील रेल्वे बोर्डाकडे जाणार असून, त्यानंतर महिन्याभरात या मार्गावर कायमस्वरुपी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
या रेल्वे गाडीत वातानुकूलित सहा, स्लिपर कोच तीन आणि तीन इंजिन जोडले होते. स्वप्न साकरत असताना ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी लोणंद ते फलटण रेल्वे मार्गावर परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
चाचणीसाठी सुशीलचंद्र, एम. के. गुप्ता, बी. के. तिडके, सुनील म्हस्के, सुनील कुमार, आर. एन. गुप्ता आदी वरिष्ठ अधिकारी व रेल्वे पोलिसांचे अधिकारी आले होते. (प्रतिनिधी)
आता नजरा बारामती व पंढरपूरकडे
लोणंद ते फलटण रेल्वेमार्गाचे शंभर टक्के काम पूर्ण होऊन रेल्वेगाडीचीही चाचणी झाली. आता एक-दोन महिन्यांत या मार्गावरून रेल्वेसेवा सुरू होणार आहे. फलटणपर्यंत काम पूर्ण झाल्याने आता फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर रेल्वेमार्गाचे काम कधी सुरू होतेय, याची उत्सुकता फलटणकरांना लागून राहिली आहे.
सर्वांच्या नजरा हिंदुरावांकडे
फलटणला रेल्वे यावी यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी प्रयत्न केले. प्रत्येक रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. फलटणच्या रेल्वेचे जनक असलेले हिंदुराव नाईक-निंबाळकर शुक्रवारच्या चाचणीवेळी उपस्थित राहतील, असे प्रत्येकाला वाटत होते. आजारपणामुळे ते उपस्थित राहिले नाही. मात्र, त्यांचे पुत्र रणजितसिंह उपस्थित राहिले. तरीही रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येकाची नजर हिंदुरावांना शोधत होती. ते कोठे आहेत, याची चौकशी सुरू होती.