सत्ताधारी-विरोधकांमध्ये तू-तू मै-मै!

By admin | Published: September 23, 2016 11:22 PM2016-09-23T23:22:56+5:302016-09-24T00:21:02+5:30

वाई पालिका सभा : यशवंतनगर ग्रामपंचायतीचा घनकचरा पालिकेच्या कचरा डेपोत टाकण्यास प्रतिबंध

In the ruling-opponents you-I-ma! | सत्ताधारी-विरोधकांमध्ये तू-तू मै-मै!

सत्ताधारी-विरोधकांमध्ये तू-तू मै-मै!

Next

वाई : वाई पालिकेत १४ व्या वित्त आयोगातील शिल्लक असलेल्या ९० लाखांचा धुरळा करण्याचा डाव सत्ताधारी आघाडी करत असल्याचा आरोप विरोधक जनकल्याण आघाडीचे नगरसेवक सचिन फरांदे यांनी विशेष सर्वसाधारण सभेत केला. गांडूळखत प्रकल्पाबाबत वाईत गांडुळाचा अजगर झाला आहे. अशा शब्दात या विषयाची फरांदे यांनी खिल्ली उडविली. त्यावरून नगराध्यक्ष सीमा नायकवडी व विरोधी पक्षनेते सचिन फरांदे यांच्यात जोरदार खडाजंगी होऊन हा विषय तहकूब ठेवण्यात आला.
नगराध्यक्ष सीमा नायकवडी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी आशा राऊत यांच्यासह नगरसेवक, पालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष सर्वसाधारण सभेस सुरुवात करण्यात आली. सभेपुढे ऐकूण २० विषयांपैकी दोन विषयांवर जोरदार खडाजंगी होऊन १८ विषयांना मंजुरी देण्यात येऊन दोन विषय तहकूब ठेवण्यात आले.
तीर्थक्षेत्र आघाडीने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वसाधारण सभेत विषय ठेवल्याचे विरोधकांनी दाखवून देऊन विषय पत्रिकेतील रविवार पेठ, पवार वस्ती ते भारतीय विद्यालय पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्याच्या विषयाला मुख्याधिकाऱ्यांची मान्यता नसल्याने या विषयावर विरोधक सचिन फरांदे यांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. तसेच बांधकाम विभागातील निविदा व कोटेशन विषय तहकूब ठेवण्यात आला. शहरातील काही रस्त्यांवर टाकावयाच्या मुरूमा संदर्भात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी शहरात ट्रॉलीला मुरूमाचा दर ९०० रुपये असताना तीन हजार रुपये ट्रॉलीला ठरविणे योग्य नव्हे असा सूर आळविला असला तरी सचिन फरांदे यांनी जोरदार विरोध करीत हाणून पाडला. अनधिकृत बांधकाम असणाऱ्यांना नळकनेक्शन दिले जाऊ नये, अनधिकृत बांधकाम असणाऱ्यांकडून घरपट्टी वसूल करून त्यांना अनधिकृत करू शकत नाही यावर
विरोधकांनी आवाज उठविला असता मुख्याधिकारी यांनी या गोष्टीला असहमती दर्शविली.
वाईतील पालिकेच्या कचरा डेपोत यशवंतनगर ग्रामपंचायतीचा व औद्योगिक वसाहतीतील कचरा टाकण्यात येत असल्याचे नगरसेवक दत्तात्रय खरात यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर पंचायतीला दरमहा एक लाख रुपये कर आकारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सीमा नायकवडी यांनी सभागृहास सांगितले. तसेच ओला कचरा व सुखा कचरा नियमानुसार वेगळा केला जात नाही. याबद्दल महेंद्र धनवे यांनी आक्षेप घेतला.
गांडूळखत प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. परंतु त्यातून खतनिर्मिती मात्र नगण्य होत असल्याने सभेत विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.
अधिकारी नारायण गोसावी यांना समाधानकारक उत्तर सभागृहात देता आले नाही. नगरसेवक अनिल सावंत यांनी वाईतील शौचालयाची अवस्था अतिशय दयनीय झाल्याचे निदर्शनास आणून देऊन त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. शहरात विविध ठिकाणी व्यायाम शाळा बांधणे, व्यायामाचे साहित्य खरेदी करणे, नगरपालिकेची जुनी इमारत भाडे तत्त्वावर देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे निर्णय घेणे, रस्त्याची गटार बांधकाम करणे आदी अठरा विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)
पालिकेचा कारभार आंधळं दळतंय..
पालिकेची निवडणूक जवळ आली असून, सत्ताधारी त्यादृष्टीने व्यूहरचना करून सर्वसाधारण सभा बोलावत आहेत. सभागृहापुढे सत्ताधारीच विषय ठेवत असून, त्यांचेच नगरसेवक विरोध असल्याचा कांगावा करत प्रशासनाला धारेवर धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. वाई पालिकेच्या कारभारावर कोणाचाही अंकुश नसून कोणताही विभाग व्यवस्थित काम करत नसल्याने विरोधकांनी सध्या पालिकेचा कारभार आंधळं दळतंय... पीठ खातंय अशी अवस्था असल्याची टीका केली आहे.

Web Title: In the ruling-opponents you-I-ma!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.