राजकारण सोडा आधी मदतीला धावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:41 AM2021-05-20T04:41:22+5:302021-05-20T04:41:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : ‘म्हातारी, कोतारी सोडा तरूण पोरांनाही कोरोना गिळू लागलाय. अन तुमी कुठं हायसा, नेत्यांनो तुमची ...

Run for help before leaving politics! | राजकारण सोडा आधी मदतीला धावा !

राजकारण सोडा आधी मदतीला धावा !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : ‘म्हातारी, कोतारी सोडा तरूण पोरांनाही कोरोना गिळू लागलाय. अन तुमी कुठं हायसा, नेत्यांनो तुमची लेकरं तडफडत्यात अन तुम्ही कोणता मुहूर्त बघताय? अशी आर्त हाक सामान्य जनता देऊ लागली आहे. हीच ती वेळ नेतृत्व सिध्द करण्याची. ‘पुन्हा नाही येणे जाणे’ या अभंगाची तरी जाणीव ठेवून कार्य करा, अशी माफक अपेक्षा संकटात सापडलेल्या जनतेची आहे.

खटाव तालुक्याला कोरोनाने विळखा घातला आहे. आपल्या आक्राळविक्राळ मगरमिठीत तो अनेकांचे श्वास कोंडून टाकू लागला आहे. रुग्णांच्या सोबत त्यांच्या सग्यासोयर्‍यांची होणारी तगमग पाहावत नाही. अगोदरच खटाव तालुक्यातील मुख्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणांमुळे सुविधांची वानवा आहे. त्यात या महामारीची भर पडली आहे. तब्बल एक हजारांहून अधिक रुग्ण तालुक्यात आहेत. दिवसागणिक त्यात भरच पडत आहे. या सर्वांना सेवा देताना तालुका आरोग्य विभागाची दमछाक होऊ लागली आहे. आता गरज आहे ती राजकारण, समाजकारणातील व्यक्तींनी पुढं येण्याची. राजकारणी फक्त प्रशासनावर ताशेरे ओढण्यातच का गुंततायत, हा सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे. ‘'आमचं नेतं काय बी करु शकत्यात'’ असं छातीठोकपणे विविध नेते मंडळींचे कार्यकर्ते सोशल मीडियावर गरळ ओकतायत . मग फक्त बोलू नका. आता वेळ करून दाखवण्याची आहे. तुमच्यात ती धमक आहे, फक्त ते सिध्द करून दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे.

‘आमचं ठरलंय’ टीमनं पुन्हा एकदा टीमवर्क दाखवायची गरज आहे. ज्या पध्दतीने राजकारणात लढता त्याच पध्दतीने आता कोरोना विरुध्द लढले पाहिजे. कारण या तालुक्याला हुतात्म्यांचा विचार व वारसा आहे. प्रशासकीय ज्ञान आहे, नेतृत्त्वाचे कौशल्य आहे. तर काहींच्याकडे आर्थिक क्षमता अन यंत्रणा आहे. काहीजण चळवळीतले अन लाथ मारीन तिथं पाणी काढीन, अशी धमक असणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. असे अनेक शिलेदार या टीम सोबत आहेतच. या सर्वांचं आपापल्यापरीने मदतीचे काम सुरु आहे. पण सद्यस्थितीत ते पुरेसे नाही.

सध्या काहींनी शासनाने जागा दिली तर कोविड सेंटर उभे करण्याची घोषणा केली आहे. अहो, तुमच्या हाकेला ओ देणाऱ्या कितीतरी जणांची मंगल कार्यालये, मोकळ्या जागा आहेत. नाममात्र भाडे देऊन अथवा त्यांच्याकडून सामाजिक दायित्व म्हणून मोफत संबंधित कार्यालय अथवा जागा घेऊन तुम्ही कोविड सेंटर सुरु करु शकता. चालढकल करण्याची किंवा वाट पाहण्याची ही वेळ नाही. तालुक्यात अजून अनेकजण आहेत जे स्वतःला नेता, पुढारी समजतात. त्या सर्वांनी परिस्थितीचं भान ठेवून आपल्या माणसांसाठी पुढे येण्याची गरज आहे.

(चौकट)

व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड वाढविण्याची गरज

खटाव तालुक्यातील प्रशासनाला विशेषत: आरोग्य विभागाला धारेवर धरुन काहीही साध्य होणार नाही. सध्याचा कोरोना रुग्णांचा आकडा बघता समोर भला मोठा डोंगर कोसळल्यासारखी परिस्थिती आहे. आरोग्य विभाग अपुऱ्या साधनांच्या अन मनुष्यबळाच्या आधारे जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. सध्या तालुक्यात १ हजार १४६ कोरोनाबाधित आहेत, अन दररोज त्यात भर पडत आहे. तालुक्यात आरोग्य विभागाचे तीन व वडूजमध्ये एक खासगी कोविड हाॅस्पिटल, तर तीन कोरोना सेंटर आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन बेड वाढविण्याची आवश्यकता आहे.

(चेौकट)

मदतीचा ओघ सुरू

खटाव तालुक्याचे सुपुत्र व कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांचा आदर्श घेण्याची सध्या गरज आहे. आमदार शिंदे यांनी कसलीही भीती न बाळगता माणसांत मिसळून मदत केलीच, पण चांगले कोविड सेंटरसुध्दा सुरू केले. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन या आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी समाजातील मान्यवरांनी मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या या लक्षवेधी कार्याची दखल घेऊन जनतेनीही आपापल्यापरीने कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरू केला आहे.

Web Title: Run for help before leaving politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.